मुंबई : लोकल ट्रेन मध्ये एका महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणात ३ हजार रुपये घेऊन प्रकरण मिटविणारा पोलीस हवालदार एकनाथ माने याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. रेल्वे पोलीस आयुक्तालयाने केलेल्या चौकशीत तो दोषी आढळला होता.
मंगळवार १७ जुन रोजी चर्चगेट विरार विशेष महिला लोकल ट्रेन मध्ये कविता मेंदाडकर (३३) या महिलेला ज्योती सिंग (२७) नावाच्या महिलेने मारहाण केली होती. ट्रेनमध्ये चढण्याचा वादातून हा प्रकार घडला होता. यावेळी ज्योतीने कविताच्या डोक्यात मोबाईल मारला होता. त्यामुळे कविताच्या डोक्याला जखम होऊन ती रक्तबंबाळ झाली होती. परंतु तरी देखील वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. केवळ समज देऊन सोडून देण्यात आले होते.
या मारहाणीची चित्रफित ४ दिवसांनी समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्यानतंर हा प्रकार उघडकीस आला होता. वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल न करता ५ हजार रुपये घेऊन तडजोड केल्याचा आरोप मारहाण झालेल्या कविता मेंदाडकर या महिलेने केला होता. प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसाने ३ हजार घेतले होते आणि जखमी महिलेला २ हजार रुपये दिले होते.
रक्तबंबाळ होऊनही गुन्हा दाखल न करणे, ५ हजार रुपये घेऊन तडजोड करणे या आरोपांमुळे यामुळे वसई रेल्वे पोलिसांचे धाबे दणाणले होते. मनसेनेही याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांना जाब विचारला होता. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी दोन्ही महिलांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. कविताची तक्रार घेऊन मारहाण करणार्या ज्योती सिंग (२७) या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता.
रेल्वे पोलीस आयुक्तांनी केले निलंबित
रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती आणि चौकशी सुरू केली होते. गुन्हा का दाखल केला नाही? तसेच तडजोडीच्या आरोपाबाबत या चौकशीत रेल्वे पोलिसांकडून खुलासा मागविण्यात आला होता. रेल्वे पोलीस मुख्यालयात पीडित आणि आरोपी महिलांना बोलावून जबाब नोंदविण्यात आला होता.
या चौकशीमध्ये वसई रेल्वे पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार एकनाथ माने दोषी असल्याचे आढळले त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी दिली. असा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.