दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारने गेल्या वर्षी दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ योजना राबवली होती. त्यावेळी अनेक भागांत दिवाळी संपल्यानंतर ‘आनंदाचा शिधा’ जनतेपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे या योजनेवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. मात्र, ही योजना यशस्वी झाल्याचा दावा करीत सरकारने आता पुन्हा ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्रय़ रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा ‘आनंदाचा शिधा’ गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ‘ई-पॉस’द्वारे वितरित केला जाणार आहे. ‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. आनंदाचा शिधा देण्यासाठी आवश्यक जिन्नसांची खरेदी करण्यासाठी ‘महाटेंडर्स’ या ऑनलाईन पोर्टलद्वारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
५०० कोटींचा खर्च
दिवाळीत ही योजना राबविण्यात आली तेव्हा ४७३ कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आता पुन्हा निविदा प्रक्रियेद्वारे ही योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी किमान ५०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली