मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने अंधेरीतील मरोळ परिसरातील महानगरपालिका मंडईचे पुनर्विकास काम हाती घेतले आहे. या मंडईच्या इमारतीत विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच, मरोळ दवाखाना धोकादायक घोषित करण्यात आल्याने त्याच्याही पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले.

मरोळ (अंधेरी पूर्व) येथील महानगरपालिका मंडईच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी बी. जे. मेहता यांची वास्तू सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या मंडईत अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांची संख्या एकूण ९४ असून मंडईत भाजीपाला व मासळी विक्रीसाठी गाळे दिले जाणार आहेत. एकूण १०६१.६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडावर प्रस्तावित आराखड्यानुसार, तळघर अधिक तळमजला अधिक ५ मजली इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. या इमारतीत तळमजला आणि पहिला मजल्यावर विद्यमान परवानाधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर, दुसरा मजला प्रकल्प बाधितांसाठी असेल.

तिसरा, चौथा आणि पाचवा मजला बाजार सभागृहासाठी असेल. ग्राहकांच्या सोयीसाठी शाकाहारी आणि मांसाहारी गाळे वेगवेगळ्या मजल्यांवर असतील. इमारतीच्या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून इमारतीत माल चढवणे/ उतरविण्यासाठी धक्का, साहित्याची ने आण करण्यासाठी उद्वाहन, वाहनतळ, गोदाम, शीतगृह, दिव्यांग व्यक्तींसाठी उतरंड, प्रसाधनगृह, मंडईसाठी स्वतंत्र जिने आणि उद्वाहन आदींची सोय करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पास सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असून त्या कालावधीत अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांना तात्पुरत्या जागी स्थलांतरित करण्यात येईल.

सद्यस्थितीत मरोळ परिसरात मरोळ दवाखाना आणि मरोळ मरोशी हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत आहे. त्यापैकी मरोळ दवाखाना इमारत संरचनात्मक परीक्षणानुसार धोकादायक घोषित करण्यात आल्याने तो मंगला नर्सिंग होम येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. महापालिकेने मरोळ दवाखान्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई अग्निशमन दल, विमानतळ प्राधिकरण, इमारत प्रस्ताव विभागाकडून प्रस्तावित इमारतीस मंजुरी मिळाली असून तळमजला अधिक पाच मजले अशी नवीन प्रस्तावित इमारतीची रचना आहे.

तळमजल्यावर प्रवेश प्रांगण, थेट निरीक्षण उपचार कक्ष, लसीकरण कक्ष, वाहनतळाची सुविधा असेल. पहिल्या व दुस-या मजल्यावर दवाखाना व हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल. तिस-या मजल्यावर ‘हेल्थ पोस्ट’ आणि चौथ्या व पाचव्या मजल्यावर सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावर डायलिसिस केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही वास्तूंच्या पुनर्बांधणी व पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, आर्थिक विकास केंद्र आहे. जागतिक दर्जाचे महानगर होण्याच्या दिशेने मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे. खड्डेमुक्त रस्ते, सुशोभित मुंबई, आपला दवाखाना या विविध माध्यमातून मुंबईकरांना उत्तमोत्तम मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मुंबईकरांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजन कार्यक्रमात सांगितले. त्यावेळी आमदार मुरजी पटेल, महानगरपालिकेचे उप आयुक्त विश्वास मोटे, बाजार विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला आदी उपस्थित होते.