मुंबईः मिठाई देणाच्या बहाण्याने घरात शिरलेल्या आरोपीने शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध महिलेचे दागिने लुटल्याची घटना दादर परिसरात सोमवारी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात जबरी चोरीसह शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिला ७० वर्षांची असून त्या दादर येथील किर्ती महाविद्यालयाजवळ राहतात.

हेही वाचा >>> मुंबईतील गुटखा तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डकडे?, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तपास

सोमवारी सायंकाळी त्या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपीने  रायकर यांच्याकडून मिठाई घेऊन आल्याचा बहाणा करून महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर एका हाताने तक्रारदारांचा गळा आवळून त्याने पिस्तुलसारखे शस्त्र त्यांच्यावर रोखले. आरोपीने घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून पलायन केले. आरोपी  ४० ते ४५ वयोगटातील असून त्याने निळ्या रंगाचा शर्ट व पॅन्ट घातली होती. आरोपीने घरातून सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले, गळ्यातील हार असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला असून याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा जबरी चोरी व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांनी दिली. याप्रकरणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.