मुंबई : वडिलांचे कष्ट बघवत नसल्याने श्रीमंत बनण्यासाठी १४ वर्षांच्या मुलाने घर सोडल्याचे उघडकीस आले आहे. घर सोडताना त्याने लिहिलेल्या एका चिठ्ठीतून ही बाब समोर आली. मुंबई पोलिसांच्या मदतीने या मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

अशोक तिवारी (३५) हे रिक्षाचालक आहे. ते विरार पूर्व येथील फुलपाडा परिसरातील सहकार नगरमधील चाळीत पत्नी आणि मुलासोबत राहतात. लहान मुलगा राज १४ वर्षांचा आहे. तो इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत आहे. तो रविवार, ३ सप्टेंबर रोजी मित्राकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु तो कुठेही सापडला नाही. त्याच्या कुटुंबियांना घरात एक चिठ्ठी सापडली.

तुमचे कष्ट बघवत नाही…

राजने हिंदी भाषेत ही चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी त्याने वडिलांना उद्देशून लिहिली आहे. ‘तुम्ही दिवसभर रिक्षा चालवता, कष्ट करता. संध्याकाळी थकून घरी येता. तुमचे कष्ट मला बघवत नाहीत. मला तुमची दया येते. त्यामुळे मी काहीतरी बनण्यासाठी जात आहे. २-३ वर्षात मी काही तरी बनेन, श्रीमंत होईन, मग घरी येईन’, असे त्याने या चिठ्ठीत लिहिले आहे. माझ्यासाठी जे पैसे खर्च करता ते बहिण काजलच्या लग्नासाठी साठवून ठेवा, असेही त्याने या चिठ्ठीत लिहिले आहे. या चिठ्ठीतील मजकूर वाचून सारेच हळहळले.

मुंबईत शोध सुरू

चिठ्ठी मिळाल्यानंतर सोमवारी राजचे वडील अशोक तिवारी यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात केली. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तो मुंबईत गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची मदत घेऊन त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मुले घर सोडून जाण्याची समस्या…

मुंबईत दररोज ४ ते ५ मुले बेपत्ता होत असतात. २०२४ मधील ९ महिन्यांत १ हजार ५८८ अल्पवयीन मुले घर सोडून गेली होती. २०१८ ते २०२३ या वर्षांत ६ हजार ७३५ मुली बेपत्ता झाल्या होत्या. घरातील वाद विवाद, भांडण, प्रेम, आकर्षण, प्रलोभन, फसवणूक आदी विविध कारणांमुळे मुले घर सोडून जातात. ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यातील ९५ टक्के मुला – मुलींना शोधून परत आणण्यात पोलिसांना यश येते. मात्र अद्यापही ५ टक्के बेपत्ता मुला – मुलींचा शोध लागलेला नाही.