मुंबई : मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता थेट निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे. एकूण ६९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र पालिका प्रशासनाने आता यात बदल केला असून २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. गेल्या चार – पाच वर्षांपासून ही पदे भरण्यात आली नव्हती. त्यामुळे अभियंत्यांची भरती करावी या मागणीसाठी अभियंत्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होत नव्हती. गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने अभियंत्यांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या पदांच्या एकूण ६९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मतदानाच्या दिवशी ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’च्या सेवा कालावधीत वाढ; मेट्रो पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत धावणार

पालिका प्रशासनाने आचारसंहितेच्या तोंडावर या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती व ११ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नुकतेच पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या कार्यक्रमात बदल झाल्याचे जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अभियंता भरती प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.