मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे दर्शन घेण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी येण्याचा अंदाज लोहमार्ग पोलिसांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे दादर स्थानकात उपनगरीय रेल्वे प्रवासी, मेल-एक्स्प्रेस प्रवाशी आणि आलेल्या अनुयायांची मोठी गर्दी होऊ शकते. ही गर्दी टाळण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या नियोजनात ६ डिसेंबरला मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक सहावरील सर्व प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दादर पूर्वेकडून (शहर हद्दीतून) फलाट क्रमांक सहामधील कोणत्याही प्रवेशद्वारातून प्रवाशांना प्रवेश करता येणार नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. तसेच प्रवेशद्वारच बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मधल्या मोठ्या पुलाचाही वापर करता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा क्रमांकाच्या फलाटातून प्रवेशास मनाई असल्याने प्रवाशांना थेट हिंदमाता येथील महानगरपालिकेच्या पुलाचा वापर करून सहा क्रमांकाच्या फलाटात येऊन सीएसएमटीला जाणाऱ्या जलद लोकल पकडता येणार आहेत. मधला मोठा पादचारी पूल केवळ लोकल आणि मेल एक्स्प्रेसने स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्व-पश्चिममेकडे शहर हद्दीत जाण्याकरिता तसेच दादर मध्य रेल्वेवरील एका फलाटातून पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या फलाटात जाण्याकरिता खुला राहणार आहे.

हेही वाचा >>> शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे

याशिवाय मध्य आणि पश्चिम रेल्वे दादर स्थानकात उपनगरीय गाड्या आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी उतरणाऱ्या प्रवाशांना महानगरपालिका पुलाने पूर्व आणि पश्चिमकडे शहर हद्दीत बाहेर जाण्यासाठी बंदी घातली आहे. तसेच महानगरपालिकेच्या पादचारी पुलावर मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील परेल बाजूकडील जिना चढण्यास तसेच उतरण्याकरिता आणि माटुंगा दिशेकडील जिना फक्त चढण्याकरिता वापरता येणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील मधल्या मोठया पुलाच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि उत्तरेकडील सुविधा गेट प्रवेशद्वार हे प्रवासी आणि अनुयायांना शहर हद्दीतून फलाटावर प्रवेश करण्यास बंद राहणार आहे. यासह अन्य उपाययोजना करतानाच लोहमार्ग पोलिसांचे मोठया प्रमाणात मनुष्यबळ तैनात असणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entry ban platform number six dadar station railway police central and western railways occasion of mahaparinirvan day mumbai print news ysh
First published on: 02-12-2022 at 10:25 IST