मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी कांदळवनापासून असलेल्या ५० मीटर बफरझोनची मर्यादा ओलंडली जात आहे. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली जाईल. या चौकशीत कोणीही असो तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत केली.
अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवन क्षेत्रात ३०० एकर जमिनीवर भराव टाकण्याचे काम सुरु आहे. दररोज अडीच हजारापेक्षा जास्त ट्रक भराव टाकत आहेत. कांदळवन आणि विकसित क्षेत्र यामध्ये मातीच भराव टाकून एक पाच ते सहा फूटाची भिंत तयार करण्यात आली आहे. दोन विधानसभा मतदार संघाएवढी जागा हडप करण्याचा विकासकाचा डाव आहे. एक माणूस मुंबईजवळची इतकी मोठी जागा हडप करीत आहे आणि सरकार काहीच करत नाही, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी लक्षवेधी मांडताना केला.
समुद्रकिनाऱ्याच्या जागा वन तसेच महसुल विभागाच्या अखत्यारीत येत असतात. कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या पर्यावरण हानीसाठी पर्यावरण विभागाने या विकासकाला दंड ठोठवला आहे. यापूर्वी हा दंड केवळ दोन लाख २२ हजार होता पण आता तो ७७ कोटी आहे. या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करुन निर्णय घेतला जाईल. टाकण्यात आलेला भराव काढण्याचे आदेश दिले जातील, असेही मुंडे यांनी सांगितले. मुंबई प्रमाणे ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, नवी मुंबई, उरण परिसरातही खाडीकिनारी भराव टाकून जागा हडप करण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संबधित विभागांची एक बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले.