मुंबई : तुम्ही जयंत पाटील यांच्या बद्दल केलेले वक्तव्य उद्या तुमच्या बद्दल आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल सुद्धा करता येईल. दिवंगत राजारामबापू पाटील उच्च दर्जाचे नेते होते. बेछुट वक्तव्याने आपली लायकी जनतेला कळते. पण, त्या व्यक्तीचे काहीही बिघडत नाही. त्यामुळे यापुढे बोलताना विचारपूर्वक बोला, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला अनिल गोटे यांनी स्वजातीय आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

समाज विघातक तत्त्वांना, काळाबाजार करणारे, गुंड, अवैध धंद्यांचे स्वयंघोषित सम्राट, भूमाफियांना भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात सामावून घेऊन, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. आजमितीस भाजपची देशपातळीवर वेगाने घसरण सुरू आहे. त्यामुळेच आज बेछुट वक्तव्य करणाऱ्यांचा भाजपमध्ये बोलबाला आहे. दुदैव असे की, कुणी कुणालाही जुमानत नाही, पक्षात बेबंदशाही माजली आहे. पडळकर त्यापैकीच आहेत. पडळकरांना बोलताना भान राहत नाही, असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. स्वसमाजाचा म्हणजे धनगर कुटुंबात जन्माला आलेला म्हणून मी वडीलकीचा सल्ला देतो की, बोलताना भान ठेवा. जयंत पाटील यांच्या विरोधात अत्यंत खालच्या शब्दात केलेली टिका उद्या, तुमच्या नेत्यांबद्दल कुणी केली तर, तुम्ही त्यांना कसे थांबवणार आहात ? दिवंगत राजारामबापू पाटील हे जनता पक्षाचे अध्यक्ष असताना दिवगंत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, उत्तमराव पाटील आदी संघ विचारांच्या नेत्यांबरोबर राजारामबापूंनी काम केले आहे. त्यांनी स्वतः राजकारणाचा उच्च दर्जा सांभाळला. सर्वांना पाळायला भाग पाडले. कधीही पातळी सोडली नाही. पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींचा वारसा असलेल्या समाजातील आहोत, याचा कधीही विसर पडू देवू नका, असा सल्लाही गोटे यांनी दिला आहे.