मुंबई : काही महिन्यांपूर्वी आरे दूध वसाहतीतील काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुन्हा खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यांच्या मधोमध उभ्या रेषेत खोदकाम केल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. तसेच, प्रवासादरम्यान रहिवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची काही महिन्यातच प्रशासनानेत दुरवस्था केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून पालिकेच्या खड्डेमुक्त रस्त्यांच्या उद्दिष्टावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईकरांना रुंद, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून वेगवान प्रवासाची अनुभूती मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, युद्धपातळीवर हे काम केले जात आहे. पावसाळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतेच यंत्रणांना दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आरे दूध वसाहतीमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरणा झाल्यामुळे संबंधित भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.
हेही वाचा >>>“योग्य वेळी अटक न केल्याने मोदी, मल्ल्या आणि चोक्सी पळून गेले”, मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला सुनावलं
काशीमिरा परिसरातील आरे पोलीस ठाणे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या शेवटच्या टप्प्यावर खोदकाम करण्यात आले आहे. तसेच, अनेक ठिकाणी रस्त्यावर तडे गेल्याचाही आरोप रहिवासी करीत आहेत. त्यामुळे काँक्रिटीकरण प्रक्रियेच्या दर्जाबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. काँक्रीट रस्त्यांचे पुन्हा खोदकाम करून नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करण्यात येत आहे. तसेच, खोदकाम करण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घ्यायला हवे. खोदकामाचे कारण स्पष्ट करून लवकरच रस्त्याची दुरुस्ती करावी. जर खोदकामामागे ठोस कारण नसल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित परिसरातील नागरिकांनी केली आहे.
