मुंबई: महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी असलेली खर्चाची मर्यादादीडपटीने वाढविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी सहा लाख तर महापालिकेसाठी १० लाखांची असलेली खर्च मर्यादा वाढविण्याची मागणी होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ही मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्हा परिषदेसाठी असलेली खर्च मर्यादा नऊ लाखांपर्यंत तर मुंबई महापालिकेसाठी खर्च मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २०१७ साली उमेदवारांना खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई महापालिका आणि १५१ ते १७५ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेसाठी उमेदवाराला १० लाख रुपये, ११६ ते १६० सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत आठ लाख रुपये, ८६ ते ११५ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत ७ लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र इतक्या पैशात निवडणूक खर्च भागविणे कठीण असल्याने ही मर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी पक्ष तसेच उमेदवारांकडून करण्यात येत होती. याची दखल घेत तब्बल आठ वर्षांनी या खर्च मर्यादेत दीडपटीने वाढ करण्यात आली आहे. महापालिकांसाठी सदस्य संख्या निहाय असलेली खर्च मर्यादा आता महापालिका वर्ग निहाय वाढविण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केला.
या आदेशानुसार ‘अ’ वर्ग नगरपालिका थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराला १५ लाख तर सदस्यपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल. ‘ब’ वर्ग नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला ११ लाख २५ हजार तर सदस्य पदाच्या उमेदवाराला ३ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख तर नगरसेवक पदाच्या उमेदवाराला अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा लाख तर सदस्य पदासाठी २ लाख २५ हजार अशी मर्यादा घालण्यात आली आहे.
महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला – खर्च मर्यादा
मुंबई – १५ लाख रुपये
(अ वर्ग) पुणे आणि नागपूर – १५ लाख रुपये
(ब वर्ग ) नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड – १३ लाख रुपये
( क वर्ग) कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई -विरार – ११ लाख रुपय
उर्वरित ड वर्ग १९ महापालिका – ९लाख रुपये
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती
जिल्हा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य
७१ ते ७५ निवडणूक गट/ गण ९ लाख रुपये ६ लाख रुपये
६१ ते ७० निवडणूक गट/ गण ७ लाख ५० हजार रुपये ५ लाख २५ हजार रुपये
५० ते ६० निवडणूक गट/ गण ६ लाख रुपये ४ लाख ५० हजार रुपये
ग्रामपंचायत थेट सरपंच सदस्य
७ ते ९ सदस्य ७५ हजार रु. ४० हजार रु.
११ ते १३ सदस्य १.५० लाख रु. ५५ हजार रु.
१५ ते १७ सदस्य २.६५ लाख रु. ७५ हजार रु.
