मुंबई : मेल, एक्स्प्रेस आणि लोकलमध्ये चोरी करणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने नुकतीच अटक केली. मुळचा बिहारमधील रहिवासी असलेला आरोपी अय्युबअली शेख (४३) याला कल्याण रेल्वे स्थानकातून पकडण्यात आले. तसेच त्याच्याकडून ९९ हजार २५७ रुपयांचे सोन्याचे दागिने, चार मोबाइल जप्त करण्यात आले असून सीएसएमटी, कुर्ला आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघड झाले आहेत.

मेल, एक्स्प्रेस आणि लोकलमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर चोरी होत  असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे याप्रकरणाचा तपासे करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी लोहमार्ग गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर या गुन्ह्यांचा  विशेष कृती दलाच्या पथकाद्वारे समांतर तपास करण्यात येत होता.

हेही वाचा >>> मुंबई : पश्चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार, चाचणी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाइल, सोन्याची अंगठी आणि रोख अशी एकूण ४१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा गुन्हा नुकताच नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा अय्युबअली शेखने केल्याचा संशय आला. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी अय्युबअली कल्याण स्थानकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात  सापळा रचून अय्युबअलीला पकडले. त्यानंतर त्याने सीएसएमटी पोलीस ठाण्यातील एक, कुर्ला आणि ठाण्यातील प्रत्येकी दोन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच, त्याच्याकडून सोन्याची एक अंगठी, सोनसाखळी आणि चार मोबाइल असा एकूण ९९ हजार २५७ किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरशुददीन शेख यांनी दिली.