मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी शुक्रवारी मिळाल्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ याबाबतची माहिती सर्व यंत्रणांना दिल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. पण विमानात काहीही संशयास्पद सापडले नाही.

याप्रकरणी धमकीचा दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस मुख्यालयालाही शुक्रवारी दूरध्वनी आला होता. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी प्राप्त झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. दूरध्वनीमध्ये विमानतळाच्या ‘टी २’ येथे बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे सर्वत्र तपासणी करण्यात आली.

त्यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी दूरध्वनी करण्यात आलेल्या क्रमांकावरून पोलीस संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत. दूरध्वनी करण्याच्या कारणाची तपासणी करण्यात येईल. मुंबई विमानतळावर व विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्र सुरू आहे. गेल्यावर्षीही अनेक धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते.

दरम्यान, त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयालाही अशाच प्रकारचा आणखी एक धमकीचा दूरध्वनी आला, त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. या दूरध्वनीनंतर लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) सीएसएमटी स्थानक परिसरात कसून शोध घेतला. मात्र, येथेही काही संशयास्पद आढळले नाही. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

धमक्यांचे सत्र सुरूच

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून देशातील सर्वच विमानतळांवर, तसेच विमान कंपन्यांना धमक्यांचे संदेश व दूरध्वनी प्राप्त व्हायला सुरूवात झाली. ऑक्टोबरमधील पहिल्या पंधरवड्यात धमक्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती. बहुतांश संदेश समाज माध्यमांद्वारे पाठवण्यात आले असून विमान कंपन्या, स्थानिक पोलीस, विमानतळ प्राधिकरण यांना ई-मेल अथवा संदेश पाठवून धमक्या देण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच दिवसात ८५ नवीन धमक्या आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी १५ दिवसांतच ७० हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले होते. प्रत्येक विमानांची व प्रवशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीत बदल

धमक्यांच्या संदेशांमुळे विमानतळावरील सुरक्षा अधिक आव्हानात्मक व गुंतागुंतीची बनली आहे. धमक्यांसाठी विशेषतः समाजमाध्यमांचा वापर होत असल्यामुळे आता विमानतळ सुरक्षा यंत्रणांनी या धमक्यांचे मूल्यमापन करताना बहुस्तरीय दृष्टिकोन अवलंबण्याचा, तसेच धमकीच्या विश्वासार्हतेची व गंभीरतेची खात्री करण्यासाठी विविध घटकांचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धमकीचे ‘विशिष्ट’ किंवा ‘अविशिष्ट’ असे वर्गीकृत करण्यापूर्वी, तिच्या माहितीच्या स्रोताची विश्वासार्हता विचारात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी सुरक्षा यंत्रणांनी कार्यप्रणालीत अनेक बदल केले आहेत.