मुंबई : वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करणाऱ्या परराज्यातील विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे चुकीची माहिती भरून अर्ज केला होता. याबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (सीईटी कक्ष) आलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आढळलेल्या १५२ विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता सीईटी कक्षाने या सर्व विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन परिषदेकडून (एमसीसी) मागविण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीसीकडून तपशील आल्यानंतर त्याची तपासणी करून विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील राज्य कोट्यांतर्गत प्रवेश केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सीईटी कक्षाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये १५२ विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून अर्ज केल्याचे उघडकीस आले. सीईटी कक्षाने संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून १६ ऑक्टोबरपर्यंत त्यांची बाजू मांडण्यासाठी व मूळ व अस्सल कागदपत्रे सादर करण्यांसदर्भात ई-मेलद्वारे सूचना केल्या होत्या. कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीतून वगळण्यात येईल, असेही जाहीर केले होते.
यापैकी एका विद्यार्थ्यांनी आपले मूळ व अस्सल कागदपत्रे सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड केले. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राची सीईटी कक्षाकडून तपासणी सुरू आहे. उर्वरित १५१ विद्यार्थ्यांकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना त्यांचा ई-मेल, दूरध्वनी क्रमांक आणि तपशील चुकीचा असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेत त्यांची तपशीलवार माहिती एमसीसीकडून मागविण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. यासंदर्भात सीईटी कक्षाने एमसीसीला पत्रव्यवहार केला आहे. एमसीसीकडून या विद्यार्थ्यांची कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
काय आहे प्रकरण ?
वैद्यकीय अभ्यासक्रमाची राज्य कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षाकडून राबविण्यात येते. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, तिसऱ्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर यामध्ये नव्याने अर्ज केलेल्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आले आहे.