मुंबईः परेदशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून बनावट व्हिसा, बनावट विमानाची तिकीटे व बनावट नोकरीचे ऑफर लेटर देऊन देशभरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीने परदेशात नोकरीच्या नावाखाली गुजरातमधील सात जणांकडून ३६ लाख रुपये घेतले होते. त्यांची बनावट व्हिसा, बनावट विमानाचे तिकीट व बनावट कंपनीचे नोकरीचे पत्र देऊन त्यांची फसवणूक केली होती. आरोपीने हरियाणा, पंजाब, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यातील एकूण १७ जणांची ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणीही हरियाणामध्ये गुन्हा दाखल आहे.
ठाण्यातील रहिवासी असलेला मोहम्मद शफिक खान (४२) जॉब कन्सल्टन्सी चालवत असून तो परदेशात नोकरीच्या बहाण्याने बनावट व्हिसा, बनावट विमानाचे तिकीट व बनावट कंपनीचे नोकरीचे ऑफर लेटर देऊन फसवणूक करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पडताळणी केली असता त्याने एस. के. इंटरप्रायझेस मॅनपॉवर जॉब कन्सलटन्सी नावाने कंपनी सुरू करून ठाणे येथे भाडयाने कार्यालय सुरू केले होते. त्यावेळी त्याने गुजरातमधील सात जणांना नोकरीचे आमिष दाखवून आग्रीपाडा पोलिसांच्या हद्दीत त्यांना बोलवले. त्यावेळी आरोपीने त्यांच्याकडून ३५ लाख ९० हजार रुपये घेतले.
रक्कम घेतल्यानंतर न्यूझीलंड व अझरबैजान या देशाचा बनावट व्हिसा, बनावट विमानाचे तिकीट व बनावट कंपनीचे नोकरीचे ऑफर लेटर देऊन त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खान विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. खान याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने हरियाणा, पंजाब, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यातील एकूण १७ लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने या व्यक्तींकडून ६७ लाख रुपये घेऊन त्यांना बनावट व्हिसा, बनावट विमानाची तिकीटे व बनावट नोकरीचे ऑफर लेटर देवून त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात यापूर्वी ठाणे उपनगर पोलीस ठाणे व कर्नाल पोलीस ठाणे, हरियाणा येथे अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने अनेकांकडून पैसे घेऊन परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची शक्यता आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.