मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार म्हणून नावाजलेले सावन कुमार टाक यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
‘सनम बेवफा’, ‘सौतन’सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे निर्माते म्हणून ओळख असलेले सावन कुमार हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होते. गेले काही दिवस ते फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. गुरुवारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने आणि अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
निर्माता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या सावन कुमार यांनी लवकरच दिग्दर्शनाची धुराही खांद्यावर घेतली. १९७२ साली आलेला ‘गोमती के किनारे’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात नायिकाप्रधान कथा किंवा एखादा सामाजिक मुद्दा घेऊन व्यावसायिक पद्धतीने मांडण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांची निर्मिती वा दिग्दर्शन असलेले अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले. राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला ‘सौतन’ हा सावन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट सुपरहिट झाला.
अनेक नव्या कलाकारांना त्यांनी आपल्या चित्रपटातून संधीही दिली. अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या हरीभाई जरीवाला यांना संजीवकुमार असे नवे नाव देऊन आपल्याच चित्रपटातून पहिली संधी देण्याचे श्रेयही सावन कुमार यांना दिले जाते. पुढे त्यांनी चित्रपटांची गाणीही लिहायला त्यांनी सुरुवात केली. ‘जिंदगी प्यार का गीत है’, ‘हम भूल गये’सारखी त्यांनी लिहिलेली काही गाणी लोकप्रिय आहेत. हृतिक रोशनचा पदार्पणातील चित्रपट ‘कहो ना प्यार है’ची काही गाणी त्यांनी लिहिली होती. लेखक, गीतकार, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून चौफेर वाटचाल करणारे सावन कुमार साजन बिना सुहागन, सौतन की बेटी, सनम बेवफा यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.