मुंबई : मुंबईतील मॉलमध्ये आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून वांद्रे येथील ‘लिंक स्क्वेअर’ मॉलला लागलेल्या आगीमुळे मॉलमधील अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील मॉल आगीच्या दुर्घटनांच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. यापूर्वीही मुंबईत भांडूप, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथील मॉलमध्ये आग लागली होती.

मुंबईत गेल्या दोन दिवसांत आग लागण्याच्या तीन घटना घडल्या. रविवारी सकाळी दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला आग लागली. त्यानंतर भायखळ्यातील बेकरीला सोमवारी संध्याकाळी आग लागली. त्यातच मंगळवारी पहाटे वांद्रे येथील ‘लिंक स्क्वेअर’ मॉलमध्ये अग्नितांडव झाले. ‘लिंक स्क्वेअर’ मंगळवारी पहाटे लागलेली आग तब्बल १२ तासांनी आटोक्यात आली.

ही आग पहाटे लागल्यामुळे मॉलमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र रौद्ररुप धारण केलेली आग दिवसा लागली असती किती मोठी जीवित हानी झाली असती. तसेच मॉलमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुंबईत आगीची दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ मॉल, बहुमजली इमारतींची तपासणी केली जाते. त्यांना नोटीसा बजावल्या जातात. मात्र थोड्या दिवसांनी हा विषय मागे पडतो. तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या भीषण आगीनंतर पालिकेने मुंबईतील सर्व ७५ मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ज्या मॉलमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा नव्हती किंवा अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन केले नव्हते अशा २९ मॉलना नोटीस बजावण्यात आली होती.

दर सहा महिन्यांनी मॉल व्यवस्थपनाने अग्निरोधक यंत्रणेची तपासणी करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वेळा मॉलमध्ये ही यंत्रणा कार्यरत नसते. तसेच मॉलमध्ये अनधिकृत बांधकाम केलेले असते. सामान कसेही, कुठेही ठेवलेले असते. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे येतात.

आतापर्यंत मॉलमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटना

१) एप्रिल २०१९ मध्ये माटुंगामध्ये बिग बाजारला आग लागली होती. या आगीत जीवित हानी झाली नव्हती. मात्र बेकायदा बांधलेल्या गोदामांमुळे ही आग भडकली होती. ही आग विझवताना अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अनधिकृत बांधकामामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आत जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे भिंत फोडून आग विझवावी लागली होती.
२) जुलै २०२० मध्ये बोरिवलीत इद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला पहाटे ३ वाजता आग लागली होती. त्यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले होते.
३) ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला आग लागली होती. ही आग विझवण्यास ५६ तास लागले होते.
४) अनधिकृत बांधकामांमुळे चर्चेत असलेल्या रघुवंशी मिलमध्ये जून २०२० मध्ये पीटू या पाच मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली होती.
५) मार्च २०२१ मध्ये भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये आग लागली होती. या मॉलमधील करोना रुग्णालयालाही आग लागली होती. त्यात दहा जणांचा मृत्यू झाला होता.
६) नोव्हेंबर २०२१ मध्ये विलेपार्ले येथील प्राईम मॉलला आग लागली होती.