मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महात्मा जोतिबा फुले मंडईत करण्यात येणाऱ्या पुनर्वसनाला मासळी व्यावसायिकांचा विरोध आहे. इमारतीत मासळी विक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या सोयी – सुविधा केवळ नावापुरत्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी महात्मा ज्योतिबा फुले मंडईत पालिका कर्मचारी व मासळी व्यावसायिकांमध्ये बैठक झाली.
या बैठकीत आंदोलनाच्या तयारीत असलेल्या मासळी व्यावसायिकांनी महापालिकेचे सर्व प्रस्ताव फेटाळून लावले. तसेच, मासळी व्यावसायिकांनी बैठकीत महात्मा जोतिबा फुले मंडईतील पुनर्वसनाला पुन्हा विरोध दर्शवत विविध मुद्दे मांडले.
छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे महात्मा जोतिबा फुले मंडईच्या पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येत आहे. या इमारतीत विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, इमारतीला अग्निशमन सुरक्षा मंजुरी प्राप्त झाली असून इमारत भोगवटा प्रमाणपत्रही लवकरच प्राप्त होईल. मात्र, या मंडईत पुनर्वसनाला मासळी व्यावसायिकांचा विरोध आहे. महानगरपालिकेने केवळ नावापुरत्या सोयी – सुविधा दिल्या असून प्रत्यक्षात मासळी विक्रेत्यांना त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल, असा दावा ते करीत आहेत.
विरोध करण्यामागील विविध मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. इमारतीच्या तळघरात पुनर्वसन करणे सोयीचे नसून देशात किंवा जगात कुठेही मासळी व्यवसाय तळघरात होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबात २४ जुलै रोजी महापालिका बाजार विभाग आणि मासळी व्यवसायिकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. मात्र, या चर्चेत तोडगा न निघाल्याने जोतिबा फुले मंडईचा तिढा वाढला आहे. याबाबत त्यांनी लेखी हरकत नोंदविली असून पुढील चर्चा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार संघटनेने केली आहे. शिवाय, क्रॉफर्ड मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचेही आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार संघटनेने केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
मासळी प्रचंड अवजड असल्याने, तसेच त्यातील पाण्याने ओल्या होणाऱ्या ३९ पायऱ्यांवरून चढ – उतार करताना अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच, चेंगराचेंगरी होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. मासळी विक्रेत्यांना अपुरी जागा देण्यात आली असून मासळी साठा ठेवण्याचे प्रयोजन नसल्याने गैरसोय होणार असल्याचे मच्छीमार समितीचे म्हणणे आहे. मासळी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चालण्यासाठी, तसेच वाहनतळासाठी जागा अपुरी आहे. यासह विविध मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. इमारतीच्या तळघरात पुनर्वसन न करता तळमजल्यावर सर्व घाऊक आणि किरकोळ मासळी व्यावसायिकाचे प्रयोजन करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.