मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा येथे २०१९ मध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील उर्वरित चार आरोपिविरूद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने नुकतेच आरोप निश्चित केले. त्यामुळे लवकरच या आरोपींवरील खटला सुरू होणार आहे.

जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. त्यात गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान शहीद झाले होते आणि १ खासगी वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनआयए न्यायालयाने मे २०२४ मध्ये एकूण आठ आरोपींपैकी चार जणांविरुद्ध आरोप निश्चित केले होते.

परंतु, सत्यनारायण राणी उर्फ किरण, परसराम तुलावी, सोमसे मडावी आणि किसन हिदामी यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यास आव्हान दिल्यामुळे त्यांच्याविरोधातील खटला वेगळा करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने चारही आरोपींचा युक्तिवाद मान्य करून त्यांच्यावरील मोक्का हटवला होता. या निर्णयाला एनआयएने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत आरोप निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याच पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने या चार उर्वरित आरोपींवरही मोक्कांतर्गत आरोप निश्चित केले. त्यामुळे, या प्रकरणी खटल्यालाही सुरूवात होईल.