मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महानगरपालिकांसह राज्यातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक सहलीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर मुंबईतील काही प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन विभागाच्या उपक्रमांतर्गत दहा देशांतील वाणिज्यदूतांनी भेट दिली. या उपक्रमांतर्गत पर्यटकांना मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील विविध प्रसिद्ध गणेश मंडळांना मोफत नेण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

 महावाणिज्यदूतांसाठी मुंबईतील ‘गणेश दर्शन विशेष सहल’ सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत गणपती दर्शन घडवण्यासाठी वातानुकूलित बसची सुविधा केली आहे. यासह अल्पोपहार, एक पर्यटन मार्गदर्शक, एक वैद्यकीय कर्मचारी आहे. तसेच प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे. या सहलीला ३१ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून ७ सप्टेंबपर्यंत ही सुविधा आहे.

राज्यात मोठय़ा प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत परदेशीही आकर्षण आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दहा देशांतील महावाणिज्यदूतांना मुंबईतील काही प्रसिद्ध गणपतींचे दर्शन शुक्रवारी घडवले. यामध्ये इस्राईल, स्वित्र्झलड, अर्जेटिना, बेलारूस, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, पोलंड, श्रीलंका, इंडोनेशिया, ब्रिटनचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. माटुंगा येथील जीएसबी गणेश मंडळ, गणेश गल्ली, लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच गिरगाव येथील सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील गणेशांचे दर्शन घेतले.

गणेश गल्लीच्या गणपतीजवळ पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महावाणिज्यदूतांचे स्वागत करून त्यांना भारतात सर्वात मोठय़ा प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या महाराष्ट्रातील वैभवशाली परंपरेची ओळख करून दिली. या उत्सवाची जगात सर्वत्र ओळख होऊन त्याचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने महावाणिज्यदूतांना गणरायांचे दर्शन घडविण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले. या माध्यमातून हा जगभरातील सर्वात मोठा उत्सव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल उपस्थित होते.

तीन ठिकाणांहून सहलीला सुरुवात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गणेशोत्सव पर्यटन योजनेनुसार मुंबईत अंधेरी, कुर्ला आणि चेंबूर या तीन ठिकाणांहून सहलीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर मुंबईचा पेशवा (विलेपार्ले), खेरवाडीचा राजा (वांद्रे), सिद्धिविनायक मंदिर (प्रभादेवी), गणेश गल्ली (लालबाग), जीएसबी गणपती (वडाळा), टिळक नगर येथील सह्याद्री मित्र मंडळ गणपती आणि चेंबूरचा राजा (सिंधी कॉलनी) या गणपतीचे दर्शन घडवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालय कार्यालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी दिली. शुक्रवापर्यंत १ हजार ६०० ज्येष्ठांनी नोंदणी केली असून ५०० ज्येष्ठांनी तर, ५५ पर्यटकांनी गणपतीचे दर्शन घेतले. मुंबईतील पर्यटकांसाठीदेखील सारखीच सुविधा असून यासाठी ८५० रुपये आकारले जाणार आहेत. तर, विदेशी पर्यटकांसाठी १ हजार ६०० रुपये आकारले जाणार आहेत.