मुंबई : पुण्यातील कोथरुड येथील गोळीबार प्रकरणी चर्चेत आलेला कुख्यात फरारी गुंड निलेश घायवळ याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि, न्यायालयाने त्याला सुधारित याचिका करण्याचे आदेश दिले.
घटनेच्या दिवशी आपण पुण्यात नव्हतो, तर ९ सप्टेंबरपासूनच परदेशात आहोत. घ़डलेल्या घटनेशी आपला कोणताही संबंध नाही, त्यामुळे आपल्याविरोधात नोंदवलेला गुन्हा माध्यमप्रणित असल्याचा युक्तिवाद घायवळ याच्यावतीने करण्यात आला. तसेच, हा गुन्हा दबावाखाली करण्यात आला आहे. त्यामुळे, आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्याची मागणीही घायवळ याच्यातर्फे केली गेली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने मात्र त्यावर आक्षेप घेतला. तसेच, गुन्हा रद्द करण्याच्या मागणीऐवजी अटकपूर्व जामिनासाठी संबंधित अर्ज करा, अशी सूचना केली. त्याचवेळी, अटकेसंदर्भात सुधारित याचिका करण्यास मुभा दिली.
आईला त्रास होतो
एकीकडे आपल्याला चुकीच्या प्रकरणात गुंतवले असून आपल्या आईला पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आऱोप घायवळ याच्या वतीने करण्यात आला. आई ७२ वर्षांची आहे, तीचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही, तरीही पोलिसांकडून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत असून तिला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही घायवळ यांनी केली.
प्रकरण काय ?
कोथरुड येथे १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मुठेश्वर चौकात तक्रारदार मित्रांसमवेत गप्पा मारत असताना, घायवळ टोळीतील गुंडांनी दुचाकीवरून किरकोळ कारणांवरून तक्रारदाराला मारहाण केली. त्यापैकी एकाने गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी कोयत्याने वार करून दहशत माजवली, असे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घायवळसह टोळीच्या सदस्यांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई केली. तथापि, घायवळ फरारी असून, तो परदेशात असल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात पाहताक्षणी ताब्यात घेण्याची नोटीस काढण्यात आली आहे.