मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागील उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने गिरगावातील लहान-मोठ्या तब्बल ८६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकाच मंचावर आणण्यात गिरगाव गणेशोत्सव समितीला यश आले आहे. या ८६ पैकी निवडक आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सवात भाविकांना ‘अष्टविनायक वारी’ घडविण्याचा संकल्प गिरगाव गणेशोत्सव समितीने सोडला असून आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपस्थळी लेण्याद्री, मोरगाव, येऊर, ओझर, महाड, पाली, सिद्धटेक आणि रांजणगाव येथील अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
‘अष्टविनायक वारी’च्या माध्यमातून भाविकांना गिरगाव प्रदक्षिणा घडणार आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी समाजात ऐक्याची गरज होती. समाजाने एकत्र यावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यापाठोपाठ गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या मंडळींची व्याख्याने, सभा, कीर्तन आदींनी गणेशोत्सवात जागर सुरू झाला. केशवजी नाईकांच्या चाळीपाठोपाठ गिरगावातील विविध वाड्या, चाळींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि त्यातून प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. गेल्या अनेक वर्षांपासून निकदवरी लेन येथील ‘गिरगावचा राजा’ आणि मुगभाटमधील गिरगावचा महाराजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
गिरगाव सोडून गेलेले अनेक चाळकरी मंडळी आवर्जून गणेशोत्सवात येथे येतात. आजघडीला गिरगाव परिसरात छोटी-मोठी ८६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत असून प्रत्येक मंडळाचा स्वतंत्र कारभार सुरू आहे. ही सर्व गणेशोत्सव मंडळे एकाच व्यासपीठावर यावीत, एकोपा निर्माण व्हावा यादृष्टीने गिरगावमधील होतकरू कार्यकर्ते गणेश लिंगायत यांनी गिरगाव सार्वजनिक समितीची स्थापना केली. या समितीमध्ये गिरगावमधील नामवंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला.
८६ मंडळे एका छत्राखाली गिरगाव सार्वजनिक समितीने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने गिरगावातील ८६ मंडळांना एकत्र आणले आहे. भाविकांना ‘अष्टविनायक वारी’ घडविण्याची संकल्पना मांडली. गिरगावमधील काही प्रसिद्ध आणि समाजप्रबोधनात आघाडीवर असलेल्या मंडळांच्या मंडपस्थळी अष्टविनायकातील एक एक मंदिर साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. गिरगावातील मोठ्या गणेशोत्सव मंडळांनीही या संकल्पनेला पाठींबा दिला आहे.
इथे घडणार अष्टविनायकाचे दर्शन
मुंबईमधील कायमस्वरुपी पर्यावरणस्नेही गणपतीची मूर्ती साकारणाऱ्या कुडाळदेशकर निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून ‘अष्टविनायक वारी’ला सुरुवात करण्यात येणार आहे. या मंडळाच्या मंडपस्थळी पुणे जिल्ह्यातील लेण्यादी येथील गिरीजात्मजाच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्याचबरोबर गिरगावातील खाडीलकर रोडवरील मुंबईतील पहिली लाल मातीची गणेशमूर्ती साकारणाऱ्या दादा महाराज सातारकर चाळीत पुणे जिल्ह्यातील येऊर येथील चिंतामणीचे, ओवळवाडी सार्वजनिक उत्सव समितीने पुणे जिल्ह्यातील विघ्नेश्वराचे, पुढे ठाकूरद्वार येथील भीमराव वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रायगड जिल्ह्यातील महाड येथील वरद विनायकाचे, धोबी वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रायगड जिल्ह्यातील पाली येथील बल्लाळेश्वराचे, मुंबईमधील दुसरा सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या जितेकर वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील सिद्धीविनायकाचे, सी. पी. टँक परिसरातील गिरगाव टपाल कार्यालयाजवळील आनंद मित्र मंडळाने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील महागणपतीचे, तर व्ही. पी. रोडचा राजा अशी ओळख असलेल्या अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुणे जिल्ह्यातील मोरगावातील मयुरेश्वराच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टविनायकांच्या मंदिरांची प्रतिकृती संबंधित मंडपस्थळी उभारण्यास सुरुवातही झाली आहे.
नैवेद्य घरपोच अनेकांना काही कारणांमुळे गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचे दर्शन घेता येत नाही. अशा मंडळींना या गणेशोत्सव मंडळांचा नैवेद्य मिळावा यासाठी गिरगाव गणेशोत्सव समितीतर्फे यंदा एक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे भाविकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने नैवेद्य मागवता येणार आहे.