मुंबई : आजघडीला गर्दीने गजबजलेल्या मुंबईत एकेकाळी घनदाट जंगल होते. असंख्य पशु-पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळत होत्या. कालांतराने मनुष्यवस्ती वाढली , मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. असे असले तरी आजही काही वन्यप्रजाती शहरीकरणाला तोंड देत तग धरून आहेत. त्यापैकीच एक दुर्मीळ असा सोनेरी कोल्हा. दरम्यान, मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबईत, नवी मुंबईतील काही भाग आणि ठाणे खाडीच्या आसपासच्या कांदळवनामुळे जैवविविधतेला आधार मिळाला आहे.

सुमारे दोन शतकापूर्वी मुंबईतील विविध भागात सोनेरी कोल्ह्याचा (गोल्डन जॅकल) वावर असल्याचे तज्ज्ञ म्हणणे आहे. आजही मुंबई महानगरातील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. मलबार आणि कंबाला या मुंबईतील दोन टेकड्या आता श्रीमंती वसाहतींसाठी ओळखल्या जातात. तेथे पूर्वी इतर वन्यप्रजातींप्रमाणे सोनेरी कोल्ह्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. या दोन्ही टेकड्य़ांसह बेटांवर तुरळक लोकवस्तीच्या ठिकाणी, मुंबईच्या उत्तरेकडील भागात सोनेरी कोल्हे आढळत होते. त्यांचा काही पुस्तकांत उल्लेख असून साधारण १७८ वर्षांपूर्वी सोनेरी कोल्ह्याचा अधिवास असल्याची नोंद आहे.

डॉ. जॉर्ज बुइस्ट यांनी १८४४ साली कुलाबा वेधशाळेच्या बागेत अनेक वेळा सोनेरी कोल्हा पाहिला होता. तर, १९१३-१४ च्या थंडीच्या हंगामात, मेजर कुनहार्ट यांनी चर्नी रोड रेल्वे स्थानक ते केनेजी समुद्र किनारा (मरिन ड्राईव्ह) दरम्यान जंगली श्वानांना सोनेरी कोल्ह्याचा पाठलाग करताना पाहिले होते. दरम्यान, सोनेरी कोल्हा युरोप, आफ्रिका, आशियातील काही भागात आढळतात. कांदळवन हा या कोल्ह्यासाठी सुरक्षित अधिवास आहे.

मानवी वस्तीतही सोनेरी कोल्हा

अनेक वेळा विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली, विरार, चेंबूर येथील कांदळवन क्षेत्रालगतच्या मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईतही कांदळवन क्षेत्र असल्याने या भागात सर्रास सोनेरी कोल्हा आढळतो.

अधिवास क्षेत्र नष्ट

कांदळवन हा या कोल्ह्यासाठी सुरक्षित अधिवास आहे. आजही मुंबई, नवी मुंबईतील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. मात्र, आजघडीला सुरू असलेली विकासकामे, वाढते शहरीकरण यामुळे त्यांचा अधिवास नष्ट होत आहे. मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबईत, नवी मुंबईतील काही भाग आणि ठाणे खाडीच्या आसपास असलेल्या कांदळवनामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर आधार मिळाला आहे. कांदळवनामुळे स्थलांतरित पक्षी, वेगवेगळे वन्यप्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीव आढळतात. त्यापैकीच एक सोनेरी कोल्हा. सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास कमी होत असल्याने त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे.

रेबीजची लागण होऊन मृत्यू

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका सोनेरी कोल्ह्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांना संशय आल्याने मृत कोल्ह्याच्या मेंदूचे नमुने मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. चाचणीच्या अहवालानुसार या कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. मुंबईत रेबीजमुळे वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना होती.

संरक्षण, संवर्धनाचा अभाव

मुंबई, तसेच नवी मुंबईत कांदळवन क्षेत्र असल्याने तेथे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आहे. मात्र, सरकारने आजतागायत सोनेरी कोल्ह्यांचे सर्वेक्षण, संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.कांदळवन परिसंस्थेतील हा प्रमुख सस्तन प्राणी असून नवी मुंबई परिसरात त्यांचा अधिवास आहे. याबाबत अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झालेले नाही किंवा त्यांच्या संवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सोनेरी कोल्ह्यांची संख्या, तुलनेत त्यांच्याविषयी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील कांदळवन परिसरात आढळणाऱ्या सोनेरी कोल्ह्यांचे वास्तव्य, त्याचे खाद्य आदींचा अभ्यास कांदळवन प्रतिष्ठान आणि खासगी संस्थांतर्फे करण्यात आला आहे.