विकास महाडिक, लोकसत्ता
मुंबई: ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर देऊ नका, सरकारची सकारात्मक बाजू मांडा, लाभार्थीच्या यशोगाथा सांगा, अशा सूचना शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेता व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत. सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा टप्प्याटप्प्याने जनतेसमोर मांडणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मंत्रालयातील प्रत्येक विभागाकडून सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांची यादी मागविण्यात आली आहे.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी पक्षाच्या नेत्या व विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, पक्षाचे सचिव किरण पावसकर हे शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत.
हेही वाचा >>> मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी विदर्भात मतदान होणार आहे. राज्यात शिवसेनेच्या दोन गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारने गेली दोन वर्षांत विदर्भात केलेल्या कामाचा पाढा वाचला.
खनिज धोरणाचा विदर्भाला लाभ
राज्याचे नवीन खनिज धोरण अंतिम टप्प्यात असून त्याचा विदर्भाला फायदा होणार आहे. सुरजागड येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटी रुपये खर्चाचे दोन स्टील प्रकल्प उभे राहात असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. यातून दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर येथे कोळसा खनिजावरील हायड्रोजन व युरिया निर्मितीचे २० हजार कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प उभे राहणार आहेत.