मुंबई : झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास असलेली पाणथळ क्षेत्रे धोक्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनापूर्वी पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी थेट पंतप्रधानांकडे केली आहे.
गेल्या काही दशकांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासांवर होत असलेले अतिक्रमण, प्रदूषण आणि जंगलतोड अशा मानवी कृतींमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. मानवनिर्मित गोष्टी, हवामान बदल यासारख्या इतर धोक्यांचा स्थलांतरित पक्ष्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ साजरा करण्यात येतो.
दरम्यान, देशात सरकारकडून विविध उपाययोजना, विकासकामे तत्परतेने केली जातात. त्याच तत्परतेने पाणथळ क्षेत्रांबाबतही सरकारने विचार करून जागतिक स्थलांतरित पक्षी दिनापूर्वी पाणथळींचे संरक्षण करण्याबाबत अंमलबजावणी करावी, अशी मागणी नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ‘पीएमओ पब्लिक इव्हेंट’ या संकेतस्थळावर केली आहे. दरम्यान, ‘सामायिक जागा- पक्ष्यांना अनुकूल शहरे आणि समुदाय.’ ही संयुक्त राष्ट्रांच्या २०२५ च्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची संकल्पना आहे.
ही संकल्पना स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाची ठिकाणे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्यामुळे पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करणे आवश्यक असून, कुमार यांनी इस्रोच्या राष्ट्रीय पाणथळ यादीप्रमाणे नकाशावर नोंद झालेल्या २.२५ हेक्टरपेक्षा मोठ्या सुमारे दोन लाख पाणथळ क्षेत्रांची तातडीने अधिसूचना करून संरक्षण करण्याची मागणी देखील केली आहे. याचबरोबर अधिकृत अधिसूचनेअभावी पाणथळ जागा ‘विकासासाठी उपलब्ध भूखंड’ म्हणून पाहिल्या जातात. ही अत्यंत गंभीर बाब असून याचा परिसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असेही कुमार यांनी सांगितले.
राज्यात केवळ १८ पाणथळ क्षेत्रे सुस्थितीत
राज्यात २३ हजार ४६ पाणथळ क्षेत्रांपैकी फक्त १८ क्षेत्रांची स्थिती चांगली असल्याचे समोर आले आहे. ही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या इंडियन वेटलैंड्स पोर्टलवरील ताज्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमधील ९४ पाणथळ क्षेत्रांची स्थिती चांगली असून मध्य प्रदेश देशात आघाडीवर आहे. त्यानंतर ओडिशा (७७), बिहार आणि तामिळनाडू (प्रत्येकी ७१), उत्तर प्रदेश (५८), दिल्ली एनसीआर (५६) आणि त्यानंतर झारखंडचा (४३) क्रमांक लागतो. दरम्यान, राज्यातील फक्त १८ पाणथळींची स्थिती चांगली असल्याची नोंद आहे.
जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाविषयी
जागतिक पक्षी स्थलांतर दिन वर्षातून दोन वेळा मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. या दिनाचा उद्देश स्थलांतरित पक्ष्यांबद्दल जनजागृती करणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित करणे हा आहे. दरवर्षी या दिवसासाठी एक विशिष्ट संकल्पना असते, जी स्थलांतरित पक्ष्यांसमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करते.