मुंबई : मुंबईसह ठाणे परिसरात उष्णतेची लाट कायम असून बुधवारी ठाण्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवडय़ातील पावसाळी वातावरण निवळल्यानंतर मुंबईत बुधवारी  पारा ३७ अंश सेल्सिअस होता. मुंबईमध्ये सकाळपासूनच उन्हाच्या झळांची तीव्रता होती. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे येथील कमाल तापनमानाचा पारा चढला आहे. त्यामुळे उष्णतेपासून बचावाचे नागरिकांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत.

 मुंबईसह ठाण्यातही उष्णतेची लाट कायम असून पुढील चार ते पाच दिवसांत या वातावरणातील स्थितीत कोणतेही बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले आहे.

गोंदियामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान होता. विदर्भात सर्वाधिक तापमान गोंदिया येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदवले. बीड येथे ४१.५, नांदेड ४०.६, सोलापूर  ४२.२, सातारा ३९.९, सांगली ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईत ४२ अंश सेल्सिअस तापमान

मुंबई : नवी मुंबईत बुधवारी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, असे भारतीय हवामान  विभागाने बुधवारी सांगितले. ‘‘ मुंबई आणि ठाण्यासह कोकणातील अनेक भागात बुधवारी उष्णतेची लाट होती,’’ असे आयएमडीचे शास्त्रज्ञ राजेंद्र जेनामानी यांनी सांगितले. मुंबईतील कुलाबा येथे ३४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. जे सामान्य तापमानापेक्षा दोन अंश सेल्सिअस अधिक आहे.