मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवेतील आर्द्रतेमुळे असह्य उकाडा सोसावा लागत आहे. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरण राहील, तसेच दुपारनंतर काही भागांत हलका पाऊस पडण्यची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली, तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. आर्द्रता ७० टक्क्यांहून अधिक होती. मात्र, मागील दोन दिवस मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने मुंबईकरांना या दोन दिवसांत काही प्रमाणात दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३५.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत उष्ण व दमट वातावरण राहील, त्याचबरोबर दुपारनंतर काही भागांत हलका पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा : मुंबई: पशुवधगृहातील प्राण्यांचे इअर टॅगिंग करणार, पालिकेकडून पशुसंवर्धन विभागाला उपकरणे देणार
दरम्यान, चंद्रपूर येथे उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित भागात उन्हाचा चटका कमी – अधिक असेल, मात्र पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.