हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हवामान विभागाकडून पुढील तीन तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई शहर, उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागात रविवारी मध्यरात्री पावासाने जोर धरला आहे. तेव्हापासून संततधार पाऊस कोसळत आहे. अंधेरी, बोरिवली, कांदिवली, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, दादर, वरळी, परळ, प्रभादेवी या परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून पावासाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत पावासाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. ही प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील सर्व भागात पावसाचा जोर कायम असणार आहे.

मुंबईत पहाटे २ ते ५ दरम्यान झालेली पावसाची नोंद

फोर्ट – ७४ मिमी

वांद्रे – ६२ मिमी

मलबार हिल – ६० मिमी

लोअर परळ- ५८ मिमी

हाजीअली- ५७ मिमी

माटुंगा – ५६ मिमी

ग्रॅन्ट रोड – ४७ मिमी

सांताक्रूझ- ४७ मिमी

दादर – ४१ मिमी

चर्चगेट- ३८ मिमी

अंधेरी – ३३ मिमी

मुंबई सेंट्रल – ३० मिमी

बोरिवली – २८ मिमी

वरळी – २६ मिमी

वांद्रे कुर्ला संकुल- २५ मिमी

वर्सोवा – २३ मिमी

दिंडोशी- २२ मिमी

आज पावसाचा अंदाज कुठे

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार सोमवारी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग , कोल्हापूर, पुणे, सातारा भागात अतिमुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त केला आहे. याचबरोबर भंडारा, चंद्रपूर, गोंदिया,वर्धा, बुलढाणा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैऋत्य मोसमी स्थिरावलेलेच

मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मोसमी वाऱ्यांनी मागील २० दिवसांपासून वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा रविवारीही कायम होती. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांत विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशामधील काही भागासह पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार, तसेच गुजरातमध्ये मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे.