मुंबई, ठाणे : मुंबई,ठाणे आणि पुणे शहराला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. मोसमातील सर्वाधिक पाऊस ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांत कोसळला. जोरदार पावसाने मुंबई-ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. 

 ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या भागांत पावसाचे धारानृत्य दिवसभर सुरूच होते. कल्याण, डोंबिवली, ठाण्यात गुरुवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी दिवसभरात १२० मिमीपेक्षा जास्त पावसाची, तर डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक २०० मिमी आणि मुंब्य्रात १९५ मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाचा जोर दोन दिवसांत कमी होणार असला, तरी राज्याच्या बहुतांश भागांत त्यानंतर सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने शुक्रवार (१६ सप्टेंबर) आणि शनिवारी (१७ सप्टेंबर) मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.  पावसाने गुरुवारी रात्रीपासून मुंबई, ठाण्याला झोडपण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडय़ात अवघ्या अर्ध्या तासात ७१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात सरासरी ९५.४९ मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षांतील दिवसभरातील हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती महापालिकेने दिली.

शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कुलाबा केंद्रात ३१.४ मि.मी., तर सांताक्रुझ केंद्रात ३९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. 

काही गावांचा संपर्क तुटला..

टिटवाळा भागात काही गावांचा संपर्क तुटला होता. काही गृहसंकुल, चाळींमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. भिवंडीत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने येथील रहिवाशांचे हाल झाले. उल्हासनदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

धरणातून विसर्ग..

भातसा धरण क्षेत्रात १४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून धरण सध्या ९९.३८ टक्के इतके भरले आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे पाचही दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले. धरणातून ६५० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रेल्वे मंद गतीने..

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण, कसारा, खोपोली मार्गावरील लोकल, सीएसएमटी-पनवेल आणि गोरेगाव हार्बर, तसेच ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर आणि चर्चगेट-विरारदरम्यानच्या लोकल तासभर विलंबाने धावत होत्या.

रस्ते  कोंडले..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाचा परिणाम ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या मुंबई-नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर, काल्हेर- कशेळी मार्ग, बाळकूम या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.