Mumbai Waterlogging Train Update: मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या तिन्ही मार्गावरील लोकल गाड्यांचा वेग मंदावला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशीरा धावत आहेत. या विलंबामुळे रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले आहे.
दरम्यान, गरज असेल तरप्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे. रविवारी रात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर जलमय झाले आहे. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नागरिक कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. परंतु या पावसाचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळकनगर रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. त्यामळे हार्बर रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या १५ ते २० उशीराने धावत आहे. मुसळधार पाऊस असूनही लोकल गाड्या सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे. मात्र पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्याही उशीरा असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. लोकल गाड्या काही अंशी उशीरा असल्या तरी एकही गाडी रद्द करण्यात आली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
गरज असेल तर घराबाहेर पडा
सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेने प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. गरज असेल तर घराबाहेर पडावे, घरातून बाहेर पडताना पूर्ण काळजी घ्यावी तसेच कोणत्याही आपतकालीन परिस्थितीत १५१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.