मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी तिन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले. मंगळवार सकाळपासून रेंगाळत धावणारी रेल्वे सेवा साडेअकरानंतर ठप्प झाली. रुळावंर पाणी साचल्याने हार्बर सेवा बंद झाली, तर मध्य रेल्वेवरील कुर्ला – सीएसएमटी लोकल बंद झाल्या. लोकल बंद पडल्याने प्रवाशांना पायी चालात जवळचे रेल्वे स्थानक गाठावे लागले. मुसळधार पाऊस आणि करावी लागलेली पायपीट यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

मुंबईत रविवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर दिसून आला. मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांत मंगळवार सकाळपासून पाणी साचल्याने लोकल ट्रेन सुमारे अर्धातास विलंबाने धावत होत्या. शीव आणि घाटकोपरदरम्यान सकाळी लोकल ट्रेन खोळंबली होती. नंतरही मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या. सकाळच्या वेळी प्रवाशांना या विलंबाचा सर्वाधिक फटका बसला होता. पावसाचा जोर वाढू लागल्याने रुळ पाण्याखाली गेले, तसेच रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले. परिणामी रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला.

सकाळी ११.३० नंतर हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प झाली. मध्य रेल्वेवरील कुर्ला – सीएसएमटी लोकल बंद झाल्या. रेल्वे रूळावर पाणी वाढत असल्याने अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल चालवणे धोकादायक ठरू शकणार आहेत, त्यामुळे लोकल ट्रेन बंद ठेवल्याचे रेल्वेने सांगितले. शीव, कुर्ला, दादर, भांडुप, मानखुर्द आदी स्थानकांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेने सकाळी नियंत्रण कक्षाची चित्रफित प्रसारित करून पश्चिम रेल्वेची लोकल सुरू असल्याचे स्पष्ट केले. परंतु वाहतूक मंदावली होती.

प्रवाशांची गर्दी ओसरली

सोमवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी घरीच राहणे पसंत केले. मंगळवारी शासनानेही सुट्टी जाहीर केली होती. अनेकांनी घरून काम करण्याचा (वर्क फ्रॉम होम) पर्याय स्वीकारला. त्यामुळे लोकल रिकाम्या होत्या. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांनीच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.