मुंबई: विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून चार नागरिक गंभीर जखमी झाले. सुमारे ३३ हजार हेक्टर्स शेतीचेही नुकसान झाले असून बाधितांना त्वरित मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

विदर्भात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महाजन यांनी निवेनाद्वारे दिली. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात ७ नागरिकांचा मृत्यू तर ४ जखमी झाले. पुरात १७ मोठी व १० लहान जनावरे मृत्युमुखी पडली असून १९२७ घरांचे अंशतः तर ४० घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. २०९ गोठ्यांचे नुकसान झाले असून ७१५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच २० हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले असून बाधित शेतकरी संख्या २९ हजार ९२० आहे. अमरावती विभागात देखील अतिवृष्टीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाली आहे. १८० घरांचे अंशतः तर ९ घरे पूर्णतः पडली आहेत. ४ जनावरे दगावली असून ३ हजार ४११ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत जिवीत व वित्तीय नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने सरकारने तातडीने उपाययोजना राबविल्या आहेत. बाधित नागरिकांना मदतीचा लाभ वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदतनिधी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला आहे. तसेच घरगुती भांडी, कपडे, टपरीधारक व दुकानदार यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना उणे (-) प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत असून, आपत्तीमधील मदत वाटपाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आल्याचेही महाजन यांनी सांगितले.