राज्यपालांनी घेतला आढावा, दोन दिवसांत मदत वाटप सुरू होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ९४ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा फटका एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना बसला आहे. बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने तातडीने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून ही मदत किती आणि कशी द्यायची याबाबतचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच घेणार आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांत या मदतीचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. भात, कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ नोव्हेंबर रोजी तातडीने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन दहा हजार कोटींची तरतूद केली. तसेच शासकीय यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचनाम्याची कामे तातडीने हाती घ्यावीत, पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे कामे करावीत, पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा आणि कोणत्याही परिस्थितीत ६ नोव्हेंबरपूर्वी पंचनामे पूर्ण करावेत, असे आदेश प्रशासनास दिले होते.

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या मदतीचे काय होणार अशी चिंता व्यक्त होत होती. आपत्ती बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटना तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकाळी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची विनंती केली. त्याची दखल घेत राज्यपालांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर तसेच अन्य विभागाचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.

पंचनामे पूर्ण : अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून एकूण ९३ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा फटका एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना बसला असून अनेक ठिकाणी संपूर्ण पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी मदत वाटपाचे नियोजन करा, ही मदत किती द्यायची याचा निर्णय लवकरच घेऊ असे सांगत राज्यपालांनी मदत वाटपाचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अवकाळी पावसात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत मदत वाटप सुरू होईल असे मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hectares of farm loss due to premature rains akp
First published on: 16-11-2019 at 01:16 IST