मुंबई : मुंबईत मानवी जीवनाची किंमत काय आहे, अर्थसंकल्पीय मर्यादा हे नागरी कामांदरम्यान किमान सुरक्षा उपलब्ध करण्यातील अपयशाचे कारण असू शकते का, असा प्रश्न वडाळा येथे पाण्याच्या टाकीत पडून दोन अल्पवयीन भावांच्या झालेल्या मृत्यूची स्वत:हून दखल घेताना गुरुवारी महापालिकेला केला. तसेच, महापालिकेला नोटीसही बजावली.

वडाळा नागरिक मंचाने टाकीच्या दुरवस्थेबाबत आणि त्यामुळे असलेल्या धोक्याबाबत वारंवार पालिकेकडे तक्रार केली होती. परंतु, अर्थसंकल्पीय मर्यादा आणि पाण्याच्या टाकीवर झाकण बसवण्यासाठी पुरेसा निधी नव्हता. तसेच, उद्यानाच्या देखभालीसाठी नेमलेल्या व्यक्तीवर उद्यानातील प्रत्येक बाबीची जबाबदारी असल्याचा दावा महापालिकेने घटनेनंतर केला होता. त्यावरही न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेताना बोट ठेवले.

हेही वाचा…बोरिवलीतील उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक, पोयसर जिमखाना संस्थेला महानगरपालिकेची नोटीस

त्याचप्रमाणे, रेल्वे आणि महापालिकेच्या अखत्यारीतील बेस्ट उपक्रमाने अपघातात जखमी झालेल्यांना किंवा मृत्यू पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकसानभरपाई धोरण आखले आहे. ते लक्षात घेता महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे अपघात किंवा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यास महापालिकेची कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व असू शकत नाही हे अनाकलनीय असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. नागरी जबाबदारी, निष्काळजीपणा आणि आर्थिक जबाबदारीशी संबंधित अनेक प्रश्न आहेत.

हेही वाचा…स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल

प्रकरण काय?

वडाळा येथील डेव्हिड बर्रेटो मार्गानजीकच्या महर्षी कर्वे उद्यानात खेळायला गेलेल्या अंकुश (४) आणि अर्जुन मनोज वगरे (५) या दोन भावांचा १७ मार्च रोजी तेथील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. या दोघांचा १८ मार्च रोजी सकाळी मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.