मुंबई : घोटाळा हा शब्द सध्या परवलीचा (फॅशन) बनला आहे, अशी टिप्पणी करून मुंबई महापालिका प्रभागांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणारी आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.

महापालिकेच्या १५ विविध प्रभागांतील इमारतींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अहवालाचा आधार घेऊन याचिकाकर्त्याने याचिका केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जनहित याचिकेत त्याने तो व्यापारी असल्याचा दावा केला आहे. याउलट, सुनावणीच्या वेळी आपण पत्रकार असल्याचे तो सांगत आहे, यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने बोट ठेवले. त्यावर, याबाबत याचिकेत सुधारणा केली जाईल, असे याचिकाकर्त्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तथापि, जनहित याचिकांची खिल्ली उडवू नका. त्याच्या उद्देशाचे पावित्र्य राखा, असे स्पष्ट करताना घोटाळासारखा शब्द सध्या परवलीचा बनला असल्याचा मुख्य न्यायमूर्तींनी पुनरूच्चार केला.

हेही वाचा – सासू-सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे अयोग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर टाळा!

जनहित याचिका दाखल करण्याबाबत उच्च न्यायालयाने काही नियम आखलेले आहेत. त्यानुसार, याचिकाकर्त्याला हमीपत्र देण्यासह केलेल्या आरोपांबाबत ठोस पुरावे सादर करावे लागतात. घोटाळा झाल्याचा आरोप कशाच्या आधारे केला जात आहे, त्याची माहिती कुठून मिळाली हे उघड करावे लागते. परंतु, या याचिकेत विरोधाभास दिसून येतो. याचिकाकर्ता याचिकेत व्यापारी असल्याचे नमूद करतो. दुसरीकडे आपण पत्रकार असल्याचे सांगतो. या याचिकेबाबत आम्ही समाधानी नाही, न्यायालय काही सल्लागार नाही, असे नमूद करून न्यायालयाने याचिका फेटाळली.

हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

दरम्यान, केवळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी याचिकाकर्त्यांने ही याचिका केल्याचे याचिका मागितल्यावर स्पष्ट होते. परंतु, त्याच्याकडे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. या कारणास्तवही याचिका ऐकली जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. पालिकेच्या १५ विविध प्रभागांतील इमारतींत नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अहवालाचा आधार घेऊन याचिकाकर्त्याने याचिका केली. जनहित याचिकेत याचिकाकर्त्याने तो व्यापारी असल्याचा दावा केला आहे. याउलट, याचिकेवरील सुनावणीच्या वेळी आपण पत्रकार असल्याचे तो सांगत आहे याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्यावर, याचिकेत याबाबत सुधारणा करण्याची हमी याचिकाकर्त्याने दिली. तथापि, जनहित याचिकांची खिल्ली उडवू नये, असे स्पष्ट करताना घोटाळासारखे शब्द सध्या फारच चर्चिले जात असल्याची टिप्पणी मुख्य न्यायमूर्तींनी केली. महापालिकेच्या प्रभागांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे.