मुंबई : मुंबई पोलीस दलात बाह्ययंत्रणेद्वारे तीन हजार पोलीस शिपाई भरतीसाठी तब्बल अडीच महिन्यांनंतर केवळ ३० कोटी रुपयांची तरतूद गृह विभागाने केली आहे. गणेशोत्सव, रमझान, नवरात्री, दिवाळी अशा सणासुदीला बंदोबस्तासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जास्तीत जास्त अकरा महिन्यांसाठी हे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पोलीस आयुक्तांनी केली होती. पण गणेशोत्सव व रमझान पार पडल्यानंतर हा निधी उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा >>> खडसे यांना नियमित जामीन; अटकेविना नियमित जामीन मिळणारे खडसे हे एकमेव माजी मंत्री

पोलीस दलात बाह्य यंत्रणेद्वारे शिपाई उपलब्ध करण्याच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कंत्राटी भरती नसून नियमित पोलीस कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून उपलब्ध होईपर्यंत सुरक्षा महामंडळाकडून हे मनुष्यबळ घेतले जाणार आहे. त्यांना केवळ बंदोबस्ताचे (स्टॅटिक डय़ुटी) काम दिले जाईल, असे विधिमंडळात सांगितले होते. मुंबई पोलीस दलासाठी तीन हजार शिपाई घेण्यासाठी गृह विभागाने २७ जुलै २३ रोजी मान्यता दिली होती. सुरक्षा महामंडळाच्या नियमानुसार या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीची रक्कम आगाऊ जमा करावी लागते व त्यानंतर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. या तीन हजार शिपायांच्या वेतनासाठी दरमहा ८ कोटी ३५ लाख रुपये आणि वार्षिक १०० कोटी २१ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी सुरक्षा महामंडळाकडे एक महिन्याचे वेतन आणि तीन महिन्यांच्या वेतनासाठीची सुरक्षा ठेव व अन्य रक्कम गृहीत धरून २९ कोटी ५८ लाख रुपये भरणे आवश्यक होते. त्यासाठी मान्यतेनंतर अडीच महिने उलटल्यावर ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.