मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत २२५० (आजी-माजी) पोलिसांनी १५ लाख रुपयात घरे देण्याचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला असून आता पहिल्या टप्प्यातील पोलिसांची घरे रिकामी करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पोलिसांना करारनामा देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

हेही वाचा >>> महिलेला मारहाण करणं राज ठाकरेंना तरी पटेल का? आरोपी मनसे पदाधिकारी म्हणाला…

पहिल्या टप्प्यात वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील काही इमारती रिकाम्या करून त्या पाडून तेथे नवीन इमारतींच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अशा इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करून इमारती रिकाम्या करून घेण्याचे काम सुरू आहे. मात्र ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील मोठ्या संख्येने पोलिसांनी आपली घरे रिकामी करण्यास नकार दिला. आम्हाला हमी म्हणून पुनर्वासित इमारतीतील घराचा करारनामा द्या अशी त्यांची मागणी होती. पण पोलिसांच्या घरांची किंमत निश्चित नसल्याने, त्यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर न झाल्याने करारनामा देणे मंडळाला शक्य नव्हते. त्यामुळे इमारती रिकाम्या करण्यात मंडळाला यश येत नव्हते.

मंडळाने पोलिसांविरोधात ९५ अ च्या (निष्कासन) नोटिसा बजाविल्या. त्याचही फायदा झाला नाही. पण आता मात्र १५ लाखांत घरे देण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्याने करारनामा देऊन इमारती रिकाम्या करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता लवकरच करारनामा देण्यास सुरुवात होईल अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homes for mumbai cops in just rs 15 lakh in bdd scheme mumbai print news zws
First published on: 01-09-2022 at 20:10 IST