मुंबई : मलनिःसारण वाहिनीत उतरलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकाविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला. कामगारांच्या मदतीने ही सफाई करण्यात येत होती. त्याबाबत महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोरिवली (प.) येथील आंबेमाता मंदिरा शेजारील के. भगत ताराचंद या हॉटेलच्या मलनिःसारण वाहिनीची साफसफाई करण्यासाठी त्याचे व्यवस्थापक शैलेश तळेकर यांनी दोन सफाई कामगार सुनील सिद्धार्थ वाकोडे (३५) व रवींद्र प्रकाश माटेकर (३२) यांना बोलावले होते. त्या दोघांनी हॉटेलच्या आतील गटाराची साफसफाई केल्यानंतर रस्त्यामधून जाणाऱ्या मुख्य मलनिःसारण वाहिनीचे झाकण उघडले.

हेही वाचा…बेस्टच्या आणिक आगारातील संग्रहालयात प्रदर्शन; बेस्ट बसची प्रतिकृती, जुनी तिकीटे, पाहता येणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील वाकोडे त्यात उतरताना गुरूवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारस खोल गटारात पडला. त्यानंतर तात्काळ पोलीस व अग्निशमन दलाला याबाबची माहिती देण्यात आली. अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मलनिःसारण वाहिनीमध्ये उतरून सुनील वाकोडेला सव्वापाचच्या सुमारास बाहेर काढले व त्याला तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी तपासणीकरून वाकोडे याला मृत घोषित केले.

हेही वाचा…रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार; लोकल विलंब, रखडलेल्या प्रकल्पाबाबत प्रवाशांचे निषेध आंदोलन

तळेकर याच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६, १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बोरिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.