‘गाढवापुढे वाचली गीता…’ याची प्रचीती पुन्हा पुन्हा प्रेक्षकांना आणून द्यायची असा विडाच उचलला असावा, इतक्या इरेला पेटून केलेला वेडेपणा म्हणजे तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल’ची आवृत्ती. याआधी प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल’ किमान बरा होता, हा विचार २४० कोटींचा चुराडा करून तयार केलेला हा चित्रपट पाहताना मनात सलत राहतो.

सीक्वेलपटांना सरावलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये ‘हाऊसफुल’ ही पहिली चित्रपट शृंखला आहे जी पाचव्या आवृत्तीपर्यंत पोहोचली आहे, पण एकूण एक वेचून आणलेल्या नामांकित हिंदी कलाकारांना घेऊन केलेला हा वेडेपणा पाहताना ही आनंदाची गोष्ट मानायची की काय… काहीच कळत नाही.

‘हाऊसफुल’ चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा त्या चित्रपटाची धुरा दिग्दर्शक साजिद खानकडे होती. पहिल्याच चित्रपटापासून शहाणपणा, तर्क या सगळ्या गोष्टी खुंटीला बांधून केवळ करमणुकीसाठी रचलेली विनोदी कथा, कमरेखालचे विनोद, द्वयर्थी संवाद, कमी कपड्यात नायकाबरोबर घुटमळणाऱ्या नायिका हाच सगळा वेडेपणा होता. तरीही ‘हाऊसफुल’ चित्रपट शृंखलेने आतापर्यंत चित्रपटगृहातून चांगला व्यवसाय केला. पहिल्या दोन चित्रपटांचं दिग्दर्शन साजिद खानने केलं, त्यानंतरच्या दोन चित्रपटांचं दिग्दर्शन तोवर चित्रपटाचे लेखक म्हणून जबाबदारी घेतलेल्या साजिद-फरहाद सामजी या बंधूंनी केलं होतं.

या पाचव्या नव्या ‘हाऊसफुल’ आवृत्तीच्या कथेचं लेखन फरहाद सामजी यांनीच केलं असलं तरी दिग्दर्शन मात्र तरुण मनसुखानी केलं आहे. तरुण मनसुखानीची दिग्दर्शकीय मांडणी ही साजिद खान आणि सामजी बंधूंपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना आकृष्ट करण्यासाठी कथेचा ढाचा खून आणि त्यामागचं रहस्य असा बांधण्यात आला असला तरी या चित्रपट शृंखलेतील कथा-मांडणीमधला असणारा वेडेपणा इथे अंमळ शिगेला पोहोचला आहे. आणि एक भलतीच जहाजावरची मनोरंजनाची सर्कस प्रेक्षकांसमोर उभी केली आहे.

कोणी तरी एका अब्जोपतीने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलिशान क्रुझवर पार्टीचं आयोजन केलं आहे. त्याच्या व्यवसायाची जबाबदारी त्याचा मुलगा देवसह एक व्यवस्थापकीय मंडळ सांभाळतं आहे. या मंडळातली माया, शिराझ, बेदी अशी तीन महत्त्वाची डोकी आणि ‘हाऊसफुल’मधील प्रसिद्ध व्यक्तिरेखा आखरी पास्ता, बटुक पटेल हे सगळे जण या वाढदिवसाच्या आयोजनात आहेत. वाढदिवसाचा सोहळा सुरू होण्याआधीच आता जगतो आहे की मरतो आहे… अशा गोंधळात हा अब्जोपती अखेरचा श्वास घेतो. मात्र, त्याआधी आपल्या संपत्तीच्या वारसाचं नाव जाहीर करतो.

‘जॉली’ नामक हा वारस क्रुझवर येणार म्हणून त्याच्या स्वागताची तयारी केली जाते, प्रत्यक्षात तीन – तीन जॉली आपापल्या प्रेयसींसह तिथे हजर होतात. यातला खरा जॉली कोण? हे ओळखण्यासाठी देव आणि त्याच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असतानाच क्रुझवर एक खून होतो. इथून पुढे खरा खुनी कोण? हा तपास आणि त्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी या प्रकरणात संशयित असलेल्या तीन जॉलींचे त्यांच्या मैत्रिणींसह सुरू असलेले प्रयत्न, त्यांच्या मूर्खपणातून उभे राहणारे प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ हे या चित्रपटाचं मुख्य कथानक आहे.

जॉली नावाच्या तीन तऱ्हांच्या व्यक्तिरेखा उभ्या करताना त्यांच्या स्वभावातला बावळटपणा हा एकमेव निकष आहे. या तीन व्यक्तिरेखा अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांनी साकारल्या आहेत. या तिघांबरोबर नायिका म्हणून जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि सोनम बाज्वा या तीन रिकामटेकड्या अभिनेत्रींची वर्णी लागली आहे. या तिघींचं नाव घेतलं तरी त्यांचं काम चित्रपटात काय असू शकतं याची कल्पना येते. त्यामुळे कचकड्याच्या बाहुल्यांसारखं इथे तिथे फिरणं आणि ‘लाल परी’सारख्या उडत्या गाण्यांवर ठुमके लावणं यापलीकडे त्यांचं काहीही काम नाही. उत्तम विनोदी अभिनयाला चित्रपटात अजिबात थारा देण्यात आलेला नाही. नाना पाटेकर यांचा काही वेळासाठी असलेला प्रवेश तेवढ्यापुरता दरारा निर्माण करतो. बाकी संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ या दोघांपासून असे अनेक कलाकार आहेत ज्यांना चित्रपटात का घेतलं आहे? हाच प्रश्न पडतो. खरंतर, विनोदी अभिनयाबरोबरच एकूणच चांगली, नावाजलेली कलावंत मंडळी चित्रपटात आहेत. अगदी रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे यांच्यासारखे दोन उत्तम मराठी कलाकार चित्रपटात आहेत, पण त्यांचं या चित्रपटात काय काम आहे? तर काहीही नाही. ना धड प्रौढ विनोदीपट, ना धड रहस्यमय कथा, ना उत्तम विनोद… कशाचाच कशाला मेळ नसलेला, निव्वळ द्वयर्थी संवाद, नाचगाणी, थिल्लर विनोद, आचरट प्रकार एकमेकांना जोडत मनोरंजन करण्याचा खर्चीक आणि बिनडोक प्रयत्न ‘हाऊसफुल ५’मधून करण्यात आला आहे. खरोखरच, त्या तुलनेत याआधीचा ‘हाऊसफुल ४’चा गोंधळ किमान कथापातळीवर बरा होता, असंच म्हणावंसं वाटतं.

हाऊसफुल ५

दिग्दर्शक : तरुण मनसुखानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकार : अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, नर्गिस फाखरी, सोनम बाज्वा व अन्य.