मुंबई : कोट्यवधींचे निर्मितीमूल्य आणि तारांकित कलाकार व तंत्रज्ञांची फौज असूनही हिंदी चित्रपटसृष्टीला गेल्या काही वर्षांत अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही. मात्र फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने तब्बल ७०० कोटींहून अधिकची कमाई करीत हिंदी चित्रपटसृष्टीला लागलेली मरगळ झटकण्याचे काम केले. त्यानंतर ‘रेड २’, ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची तिकीट खिडकीवर यशस्वी घौडदौड सुरू असून चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत ६६.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी पाठ फिरवलेल्या रसिकप्रेक्षकांची पावले पुन्हा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळत असून, हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळत असल्याचे चित्र आहे.

हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेचा संगम असणारा आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रॉडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट २० जून २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्मितीमूल्य ९० कोटी असून चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत ६६.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट पहिल्या चारच दिवसांत निम्म्याहून अधिक निर्मितीमूल्य (बजेट) वसूल करण्यात यशस्वी ठरला आहे. तर येत्या दोन ते तीन दिवसांत ९० कोटी हे निर्मितीमूल्य संपूर्णतः वसूल होण्याची शक्यता आहे. वेगळा आशय आणि अभ्यासपूर्ण चित्रपटनिर्मितीसाठी विशेषतः आमिर खान ओळखला जातो. त्यामुळे नव्या दृष्टिकोनातून एक वेगळा विषय ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खान याने मांडला आहे. या चित्रपटाचे कथानक विशेष मुलांच्या मध्यवर्ती फिरते. तसेच ‘सबका अपना अपना नॉर्मल’ असे घोषवाक्य असलेला हा चित्रपट सर्वांना स्वीकारण्याचा व सर्वसमावेशकतेचा संदेश देतो. परिणामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाला सर्वच वयोगटातील रसिकप्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साचेबद्ध विषयांच्या पलीकडच्या कथा रसिकप्रेक्षकांना आवडत असून येत्या काळात हीच गोष्ट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या हिंदी चित्रपटांचे पुन्हा प्रदर्शन करून कोलमडलेली व्यावसायिक बाजू भक्कम करण्याचा आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे वळविण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’, ‘रॉकस्टार’, ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. तर २०२५ च्या पूर्वार्धात जून अखेरपर्यंत ‘छावा’, ‘रेड २’, ‘हाऊसफुल ५’, ‘सितारे जमीन पर’ या नवीन हिंदी चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अनुषंगाने येत्या काळातील वैविध्यपूर्ण हिंदी चित्रपटांची संख्या पाहता उत्तरार्धात डिसेंबर अखेरपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीची तिकीट खिडकीवर उत्तम कामगिरी होण्याची शक्यता वाढली आहे.

‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची दिवसनिहाय कमाई

दिवस पहिला २० जून : १०.७ कोटी

दिवस दुसरा २१ जून : २०.२ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवस तिसरा २२ जून : २७.२५ कोटी दिवस चौथा २३ जून : ८.५ कोटी