…तरच भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील – खुर्शिद मेहमूद कसुरी

खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या ‘नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी होते आहे.

khursheed mehmood kasuri
भारत आणि पाकिस्तानातील नेतृत्त्वाने सर्वसामान्य लोकांना गृहित धरू नये. सामान्यांना सर्व समजते, असेही कसुरी यांनी स्पष्ट केले

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सर्वसामान्य लोकांमधील संबंध कायम राहिले, तरच दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. जर दोन्ही देशातील नागरिकांनी एकमेकांशी संबंध ठेवायचेच नाही, असे ठरवले, तर सर्व संपून जाईल, असे मत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानातील नेतृत्त्वाने सर्वसामान्य लोकांना गृहित धरू नये. सामान्यांना सर्व समजते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या ‘नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी संध्याकाळी मुंबईमध्ये नेहरू सेंटर येथे होते आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञातांनी केलेल्या शाईफेकीचा त्यांनी तीव्र निषेध केला. लोकशाही व्यवस्थेमध्ये आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, निषेध करण्याची ही पद्धत उचित नाही, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, दोन्ही देशांतील सर्वसामान्य नागरिकांवर माझा विश्वास आहे. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध राहावेत, असेच सामान्यांना वाटते. मात्र, नेतृत्त्वाने त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांना गृहित न धरता परिस्थितीचा योग्य जाणीव करून दिली पाहिजे. मी हाच संदेश माझ्या या पुस्तकातून मांडला आहे. पुस्तक लिहिण्यासाठी मला चार वर्षे लागली. त्यातील प्रत्येक मुद्द्याला संदर्भ देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता जिथे जिथे जाणे शक्य आहे. तिथे जाऊन मी माझा संदेश तेथील लोकांपर्यंत पोहोचविणार आहे.
पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मला सुधींद्र कुलकर्णी यांनी निमंत्रण दिले. त्यांच्या निमंत्रणावरूनच मी इथे आलो आहे. त्यामुळे कोणीतरी विरोध करतंय, म्हणून मी प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द करणार नाही. जर सुधींद्र कुलकर्णी यांनीच हा कार्यक्रम रद्द केला, तर मला काही म्हणायचे नाही, असेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I recognise peoples right to protest but what has happened with sudheendra kulkarni is not protest says kasuri on ink attack

ताज्या बातम्या