मुंबई : शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुबईतील संशोधकांनी विकसित केलेल्या स्पोकन ट्यूयोरियलला जागतिक दर्जाच्या आयईईई या संस्थेकडून मान्यता देण्यात आली आहे. भारतातील शैक्षणिक उपक्रमाला अशा प्रकारे आयईईईची मानक म्हणून मान्यता मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मान्यतेमुळे आयआयटी मुंबईचा स्पोकन ट्यूटोरियल प्रकल्प डिजिटल शिक्षणात जागतिक स्तरावर आघाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे.

आयआयटी मुंबईने स्पोकन ट्यूयोरियल हे स्वयंशिक्षण, नोकरी करत शिक्षण घेणाऱ्यांना नजरेसमोर ठेऊन विकसित केले आहे. यामुळे स्वयं-शिक्षणासाठी सुलभ आणि प्रभावी ट्यूटोरियल डिझाइनमुळे हा प्रकल्प शाळा, महाविद्यालये आणि वंचित समुदायातील लाखो विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. हीच बाब अधोरेखीत करीत आईईई पी २९५५ हे स्वयं-शिक्षणासाठी असलेल्या मानकाने स्पोकन ट्यूयोरियलला गौरविण्यात आले आहे. आतापर्यंत सरकारी कौशल्य कार्यक्रम, शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण भागातील जवळपास ९० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विविध देशांतील सुमारे २० सदस्यांची समिती मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करण्यासाठी, पुनरावलोकन करण्यासाठी आणि अंतिम रूप देण्यासाठी दरमहा बैठक घेत होती. आयईईई स्टँडर्ड्स असोसिएशनने १९ जून २०२५ रोजी याला अधिकृतपणे मान्यता दिली. ही पद्धत सध्या एक हजारांहून अधिक संस्थांमध्ये लागू करण्यात आली आहे आणि २० हून अधिक भारतीय भाषांमध्ये ट्यूटोरियल अनुवादित करण्यात आले आहेत. यामुळे डिजिटल साक्षरता, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर कौशल्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत.

स्पोकन ट्यूटोरियलला आयईईई मानक म्हणून मान्यता मिळणे हा आयआयटी मुंबई आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. स्वदेशी शैक्षणिक नवीन उपक्रम केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर जागतिक स्तरावरही मानके स्थापित करू शकतात. हे या उपक्रमाने दाखवून दिले आहे, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च दर्जाचे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकते, मग तो कुठेही असो, या आमच्या दृष्टिकोनाचे हे प्रमाण आहे. आयईईई मानक केवळ तांत्रिक उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व करीत नाही, तर शिक्षणात समानतेची वचनबद्धता देखील दर्शवते, असे आयआयटी बॉम्बे येथील एमेरिटस प्रोफेसर आणि स्पोकन ट्यूटोरियलचे शोधक प्रा. कन्नन मौदगल्या यांनी सांगितले.