“कितीही भ्रम निर्माण केला तरी या राज्याची जनता ते स्वीकारणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर खरोखर लाभले असते तर आपण आज राज्याचे मुख्यमंत्री असता, मात्र आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावं लागतय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव ही आग आहे. त्या आगीशी खेळू नका.” असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, “आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नुसते हात पोळलेले नाही. तर त्यांची राजकीय कारकिर्द देखील पोळलेली आहे. त्यामुळे हे जे आमचे आमदार तुम्ही कैद करून ठेवलेले आहेत किंवा तुमच्या ताब्यात ठेवलेले आहेत जनता त्यांचा निर्णय घेईल. त्यांच्याविषयी बोलणं आता आम्ही थांबवलेलं आहे कारण आता ते महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघात जायचं आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असेल, तर तो त्यांना लखलाभ ठरो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे घेवून जावू आणि हीच शिवसेना भविष्यात या राज्याचं नेतृत्व करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.”

तसेच, “महाराष्ट्राच्या मातीत कधी ढोंगीपणाला, खोटेपणाला स्थान दिलं गेलं नाही, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या पाठीत आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारचे वार केलेत, परंतु ते वार पचवून शिवसेना उभी आहे. आजही भाजपाला महाराष्ट्रात स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी तेव्हाही बाळासाहेब ठाकरे लागले आजही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले शिवसैनिक मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत बसवावे लागतात. यातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं महत्व अधोरेखीत होतय.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.