लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी दर्शन सोळंकीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या खोलीत सापडलेली चिठ्ठी त्यानेच लिहिली असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल गुन्हे शाखेला शुक्रवारी सादर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंत दोघांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात दर्शनने मृत्युपूर्वी चिठ्ठीत नाव नमुद केलेल्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
सोळंकीच्या खोलीत सापडलेली चिठ्ठी त्यानेच लिहिल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या हस्तांक्षर विश्लेषण कक्षाने याबाबतचा अहवाल गुन्हे शाखेला सादर केला आहे. या चिठ्ठीत एका विद्यार्थ्याचे नाव नमुद करण्यात आले होते. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी वाचा-मुंबई: चित्रफीत वायरल करण्याची धमकी देऊन कलाकार तरूणीकडून २३ लाखांची खंडणी उकळली
याप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने चिठ्ठीत नाव नमुद असलेल्या या विद्यार्थ्याची चौकशी केली. सोळंकीने १२ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी सोळंकीने आपली माफी मागितल्याचे या विद्यार्थ्याने चौकशीत सांगितले. पण या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती या विद्यार्थ्याने दिलेली नाही. दरम्यान, सदर विद्यार्थी चौकशीत माहिती देत नसल्यामुळे त्याची लाय डिटेक्टर चाचणी करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष तपास पथकाने उदय सिंह मिना नावाच्या व्यक्तीचाही जबाब नोंदवला. एका विद्यार्थ्याला दर्शन सोळंकी याच्या जातीबाबत कळाल्यानंतर त्याने आपल्याशी बोलणे बंद केल्याचे दर्शनने मिना याला सांगितले होते. त्यावेळी मिनाने त्याला समजावले होते. तसेच संबंधित मित्र बोलत नसेल, तर जाऊ दे, तू दुसऱ्या मित्रांसोबत बोलत जा, असे समजल्यावल्याचे मिना याने जबाबात म्हटले आहे.