मुंबई : भुलेश्वर येथे तोतया पोलिसांनी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडील ५० लाख रुपयांची बॅग हिसकावली. त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीला नवी मुंबईत सोडून पलायन केले. याबाबतची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना पुणे, ठाणे व सातारा परिसरातून सहा तासांत अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यांत वापरलेली मोटरगाडी, ३९ लाख रोकड व सुरा पोलिसांनी जप्त केला आहे.
अजय बाळकृष्ण लोखंडे (वय ३२ वर्षे, सांगली), रेवणसिद्ध राजाराम जावडे ( वय २७ वर्षे, सांगली), सागर दामोदर जाधव ( वय २९ वर्षे, सांगली), विकास अंकुश देहळे ( वय ३८ वर्षे, सांगली) व दिलीप काशिनाथ ढेकळे (वय ४३ वर्षे, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भुलेश्वर येथील पोपळवाडी तिसरी येथून जात असताना चार व्यक्तींनी त्याला अडवले. पोलीस असल्याची बतावणी करून त्याला मोटरगाडीत जबरदस्तीने बसवले. आरोपींनी त्याचे अपहरण केल्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्याकडून ५० लाख रुपये असलेली बॅग हिसकावली. त्यानंतर आरोपींनी तक्रारदारांच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून त्याला नवी मुंबईतील खारघर येथे रस्त्याच्या बाजूला उतरवले. तसेच मुंबईमध्ये परत आल्यास चकमकीत ठार मारण्याची धमकी दिली.
अवघ्या सहा तासांत आरोपी ताब्यात
याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर लोकमान्य टिळक(एल.टी) मार्ग पोलिसांनी तात्काळ चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या तपासात दोन आरोपी पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पुणे पोलिसांच्या मदतीने खेडशिवापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत इतर आरोपींची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पुणे सातारा महामार्गावर आरोपींचा माग काढून सातारा येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी पाचव्या आरोपीचाही याप्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला ठाण्यातील शांतीनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा सहभाग आढळल्यामुळे त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेली मोटरगाडी, ३९ लाखांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला सुरा ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींकडे कसून चौकशी सुरू करण्यात येत आहे.