मुंबई: उत्खनकाने दिलेल्या धडकेत एक पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अंधेरीच्या वीरा देसाई मार्गावर गुरूवारी दुपारी हा अपघात झाला. हा उत्खनक चुकीच्या मार्गाने आल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. अंबोली पोलिसांनी उत्खनक चालकाला अटक केली आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
विजय पुजारी (४३) हे जोगेश्वरीत रहात होते. एका खासगी कंपनीत ते काम करीत होते. गुरूवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ते अंधेरी (प.) येथील वीरा देसाई रोड परिसरातून जात होते. त्यावेळी अचानक आलेल्या उत्खनकाने त्यांना धडक दिली. या धडकेत पुजारी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मुळात हा रस्ता निमुळता होता.
उत्खनक चालक चुकीच्या मार्गाने रस्त्यावर आला होता असे स्थानिकांनी सांगितले. अपघातानंतर स्थानिकांनी उत्खनक चालक सुरज कुमार रावत (२३) याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. हा उत्खनक जेसीबी कंपनीचा होता. रस्त्याच्या कामासाठी तो या परिसरात आणण्यात आला होता. हा अपघात सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उत्खनक चालक चुकीच्या दिशेने आल्याने हा अपघात घडला. या अपघातात पादचारी विजय पुजारी यांचा मृत्यू झाला, आम्ही उत्खनक चालक सुरज रावत याला अटक केली आहे, अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली.