मुंबई : बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव यामुळे राज्यामध्ये नैराश्यग्रस्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांना तणावमुक्त करण्यासाठी व त्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘टेलिमानस’ या कॉल सेंटरवर वर्षभरात तरुणांनी सर्वाधिक दूरध्वनी केले आहेत. साधारण १८ ते ४५ वयोगटातील तरुणांनी ‘टेलिमानस’वर दूरध्वनी करून आपल्या समस्या मांडल्या आहेत.

बदलती जीवनशैली, परीक्षेमध्ये अपयश, चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश, नोकरीमधील कामाचा ताण, व्यवसायामध्ये अपयश, करियरची चिंता अशा विविध कारणांमुळे सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात तणावाखाली वावरत आहे. सतत कामात व्यस्त राहणाऱ्या तरुणांना प्रचंड थकवा जाणवत आहे. मात्र आपण मानसिक ताणावाखाली असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही. सततच्या या ताणतणावामुळे ते मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊन नैराश्यग्रस्त होत आहेत. नैराश्यग्रस्त अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी जाणे आवश्यक असते. मात्र मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे ती व्यक्ती वेडी झाली आहे, असा सर्वसाधारण समज समाजामध्ये आहे. त्यामुळे अनेक जण मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे टाळतात. परिणामी त्यांचा मानसिक आजार अधिकच वाढतो. नागरिकांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘टेलिमानस’ या कॉलसेंटरला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरामध्ये राज्यातील विविध भागांतून ५० हजारांहून अधिक नागरिकांनी संपर्क साधला असून यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा…मुंबई : रस्त्यांचे कंत्राट रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, ६४ कोटी रुपये दंड ३० दिवसांत भरण्याचे प्रशासनाचे आदेश

राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील ७३.५ टक्के तरुणांनी ‘टेलिमानस’ केंद्राशी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याखालोखाल ४६ ते ६४ वयोगटातील १६ टक्के नागरिक, तर १३ ते १७ वयोगटातील ४.३ टक्के, १२ वर्षांखालील मुलांचे प्रमाण १.२ टक्के आणि ६५ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण ४.९ टक्के इतके असल्याची माहिती राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणचे मुख्य कार्यकार अधिकारी आणि मानसिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली.

हेही वाचा…मुंबई : टास्क फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी बँक खाते केले रिकामे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आजाराने तरुणाई त्रस्त

नैराश्यग्रस्त असलेल्या तरुणाईचे प्रमाण वाढत असून, त्याखालोखाल सामाजिक व कामाच्या ठिकाणी असलेला तणाव, चिंता, परीक्षेतील तणाव, अनुत्तीर्ण होण्याची भिती आणि नातेसंबंधामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अधिक आहेत.