मुंबई : राज्यातील पाणथळ क्षेत्रांची स्थिती चिंताजनक असून राज्यात २३ हजार ४६ पाणथळ क्षेत्रांपैकी फक्त १८ क्षेत्रांची स्थिती चांगली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, १८ ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या इंडियन वेटलँड्स पोर्टलवरील ताज्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमधील ९४ पाणथळ क्षेत्रांची स्थिती चांगली असून देशात आघाडीवर आहे, त्यानंतर ओडिशा (७७), बिहार आणि तामिळनाडू (प्रत्येकी ७१), उत्तर प्रदेश (५८), दिल्ली एनसीआर (५६) आणि त्यानंतर झारखंडचा (४३) क्रमांक लागतो. दरम्यान, राज्यातील फक्त १८ पाणथळींची स्थिती चांगली असल्याचे नोंदविले गेले आहे. त्यामुळे राज्य पर्यावरणीय दृष्ट्या गंभीर संकटाला तोंड देत असल्याचे पर्यावरणप्रेमी तसेच अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच राज्यातील पाणथळ जागा संवर्धनाच्या कामात उशीर झाल्याने, त्यांना निर्माण होणारा धोका वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाणथळ क्षेत्रांना चांगल्या स्थितीचा दर्जा देताना जलविज्ञान आणि पाणथळ क्षेत्र, मॅपिंग, व्यवस्थापन योजना आणि अधिसूचना यासारख्या प्रशासनाचे तपशील सूचीबद्ध केले जातात.
पाणथळ जागा केवळ जलसंचय, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वपूर्ण नाहीत. त्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठीही अत्यंत आवश्यक असतात. राज्यातील पाणथळ क्षेत्रांच्या संरक्षण, संवर्धनाचा विचार केला असता शहरीकरणामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः या जागांचा विकासाच्या दृष्टीने वापर केला जात असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, पाणथळ क्षेत्रांना चांगल्या स्थितीचा दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत महाराष्ट्र मागे आहे. यामुळे पाणथळ क्षेत्रांवर अधिकृत अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. या क्षेत्रांचे संवर्धन न केल्यास त्यांचे पर्यावरणीय नुकसान अपरिवर्तनीय होईल, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
राज्यातील चांगली स्थिती असलेले पाणथळ क्षेत्र
पवई
विहार- मुंबई
ठाणे खाडी- मुंबई
वसई खाडी- ठाणे<br>सोनाला धरण- वाशिम
रंकाळा- कोल्हापूर<br>मोयाने- नंदुरबार
वेंगुर्ला- सिंधुदुर्ग
नांदुर मढमेश्वर- नाशिक
मांजरा- धाराशिव
माकणी- धाराशिव
लोणार तलाव- भंडारा
धन्नुर- गडचिरोली<br>धामापूर- सिंधुदुर्ग
धरमतार खाडी- रायगड
अदन धरण- वाशिम
पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनाची वाईट स्थिती आहे. सरकारने भारतातील जलसंपत्तीचे अमृत धरोहर, मौल्यवान वारसा असा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात मात्र तसे काही दिसून येत नाही. तसेच सरकार मोठ्या उत्साहात रामसर स्थळांची घोषणा करते. मात्र, पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करते. – बी.एन.कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाऊंडेशन
गेले काही वर्ष पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन, संरक्षण न करता त्यांचा वापर विकासकामासाठी केला जात आहे. हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. यासाठी संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे. – नंदकुमार पवार, अध्यक्ष, लघु पारंपारिक मत्स्य कामगार संघटना