मुंबई : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या निवडक विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय लष्कराच्या नौकानयन (यॉटिंग) विभागाकडून निःशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या शाळेतील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी बिर्ला क्रीडा केंद्राच्या मागील बाजूस तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करून दण्यात आली आहे. महानगरपालिका आणि भारतीय लष्करी नौकानयन विभाग यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार झाला आहे.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविले जात आहे. या धर्तीवर नौकानयन प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथील बिर्ला क्रीडा भवन परिसरात २० सप्टेंबर रोजी डॉ. अमित सैनी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर, डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, स्वराज्यभूमी संदर्भातील उच्चस्तरीय समितीच्या सदस्या इंद्राणी मलकानी, कर्नल अमेय हुमनाबादकर, कर्नल आनंद आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुषंगाने भारतीय लष्कराचे नौकानयन (यॉटिंग) प्रशिक्षण देण्यासाठी लष्करी नौकानयन विभाग आणि महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त व स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) संदर्भातील उच्चस्तरीय समितीच्या सदस्य सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखालील उच्चस्तरीय समितीचेही यात विशेष सहकार्य लाभले आहे.

स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी) संदर्भातील उच्चस्तरीय समितीने या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महानगरपालिकेतर्फे या करारांतर्गत प्रशिक्षणासाठी बिर्ला क्रीडा केंद्राच्या मागील बाजूस तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांचीही पूर्तता करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक बोटी आणि अन्य संसाधनांची उपलब्धता तसेच प्रशिक्षकांची नेमणूक लष्करी नौकानयन विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी नौकानयनाची आवड असणाऱ्या, तसेच या प्रशिक्षणासाठी निश्चित सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी नुकतीच पार पडली असून त्यांना आता प्रशिक्षकांमार्फत नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.