मुंबई : मुंबई पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि कायम प्रवाशांच्या सर्वाधिक वर्दळीत हरवणाऱ्या सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि लगतच्या परिसरात फेरीवाल्यांचा ठिय्या कायम असून दिवसेंदिवस फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत आहे. आता सीएसएमटी रेल्वे स्थानकालगतच्या बस आगाराच्या हद्दीतही फेरीवाले पथाऱ्या पसरू लागले आहेत.

फेरीवाले निष्काळजीपणे बस स्थानक परिसरातच प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा फेकून देत आहेत. मात्र, पालिकेने तैनात केलेल्या ‘क्लिन अप मार्शल’चे बंदी असलेल्या या प्लास्टिककडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सीएसएमटी स्थानकाबाहेरील परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. पथाऱ्या पसरून प्रवाशांची वाट अडविणाऱ्या या फेरीवाल्यांकडे पालिकेकडूनही दुर्लक्ष केले जाते. फेरीवाल्यांच्या समस्येबाबत पालिका प्रशासनावर अनेकदा टीका केली जाते. मात्र, ही समस्या मार्गी लावण्यात पालिकेला यश आलेले नाही. स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी एप्रिलमध्ये पालिकेच्या ए विभागात क्लिन अप मार्शल्स नेमण्यात आले आहेत. अस्वच्छता करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : लोकशाहीत अल्पसंख्याक समुदायांना समन्याय आवश्यक, अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी यांचे मत

प्लास्टिकविरोधी कारवाईदेखील थंडावली

कपड्यांची विक्री करणारे फेरीवाले प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा तेथेच टाकून देतात. अनेकदा त्या वाऱ्याने उडून इकडे तिकडे पसरतात. काही वेळा हे फेरीवाले बसस्थानकासमोर पथाऱ्या पसरतात. मात्र, त्याकडेही लक्ष दिले जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेची प्लास्टिकविरोधी कारवाईदेखील थंडावली आहे.